राजामौलींच्या चित्रपटात प्रियांका चोप्रा
एप्रिल महिन्यात सुरू होणार चित्रिकरण
प्रियांका चोप्राच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील पुनरागमनाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. यापूर्वी 2019 मध्ये तिचा ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. तर 2021 मध्ये ती ओटीटीवर प्रदर्शित ‘द व्हाइट टायगर’ या चित्रपटात दिसून आली होती. प्रियांका आता बॉलिवूडमधून नव्हे तेलगू चित्रपटातून भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहे.
प्रियांकाने एस.एस. राजामौली यांच्या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात महेश बाबू मुख्य भूमिकेत आहे. राजामौली यांच्या या अनोख्या जंगल अॅडव्हेंचर चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. परंतु यात महेश बाबू एका संशोधकाच्या भूमिकेत असेल. या चित्रपटात राजामौली हे बाहुबली आणि आरआरआर प्रमाणेच एक महाकाव्य कहाणीला मोठ्या पडद्यावर दर्शविणार आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे. राजामौली यांचा हा चित्रपट पॅन इंडिया असेल आणि तो जागतिक स्तरावर प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटाची कहाणी लिहिण्याचे काम संपुष्टात आले आहे. प्रियांकाचा चाहतावर्ग जगभरात असल्याने तिची निवड या चित्रपटासाठी करण्यात आली आहे. याचे चित्रिकरण भारत आणि अमेरिकेच्या स्टुडिओंसह आफ्रिकेतील जंगलांमध्येही केले जाणार आहे.