रेल्वेची स्वप्ने दाखविणाऱ्या प्रिया यादवला जेलची हवा
डिचोली पोलिसांनी कोल्हापूरात घेतली ताब्यात : ऑगस्ट महिन्यापासून पोलीस होते मागावार
डिचोली : रेल्वेत नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून अनेकांना लाखो ऊपयांना गंडा घालणारी प्रिया अजय यादव या महिलेला अटक करण्यात डिचोली पोलिसांना यश आले आहे. ऑगस्ट महिन्यात प्रिया हिच्या विरोधात डिचोली पोलिसस्थानकात तक्रार नोंदविली होती. त्यावेळेपासून डिचोली पोलिस तिच्या मागावर होते. अखेर कोल्हापूर येथून तिला अटक करण्यात डिचोली पोलिसांना यश आले. ठकसेन प्रियाला डिचोली प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
प्रिया यादव हिच्या विरोधात लक्ष्मी दलवाई या महिलेने 22 ऑगस्ट रोजी तक्रार केली होती. रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 20 लाख 70 हजार ऊपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर प्रिया गायब होती. या दरम्यान पोलिसांनी चौकशीला गती देत प्रिया यादवने बँकेत 116 ग्रॅम सोने तारण ठेवून गोल्ड लोन घेतल्याचे उघड झाले. या सोन्याची किंमत सध्याच्या बाजारात भावानुसार 9 लाख ऊपये असल्याचे समजते. सदर सोने जप्त करण्यात आले आहे.
उपलब्ध माहितीनुसार प्रियाने अनेकांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून एक कोटीहून अधिक ऊपयांचा गंडा घातला आहे. मात्र तिच्या नावे एकाही बँकेत खाते नाही. ती चालवत असलेल्या तीन गाड्यांची तिच्या नावावर नोंदणी नाही. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबलचा समावेश असल्याचे समोर आल्यावर रोहन वेनजी याला सेवेतून निलंबित केले आहे. प्रिया यादव ही तक्रारीनंतर सुमारे दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ बेपत्ता होती. विशेष तंत्रज्ञानाचा अवलंब करून तिचा शोध घेण्यात आला.
ती फुलेवाडी कोल्हापूर येथे असल्याचा सुगावा लागताच डिचोली पोलिसस्थानकातून पोलिस उपनिरीक्षक विकेश हडफडकर, पोलिस कॉन्स्टेबल विशाल परब व महिला पोलिस कॉन्स्टेबल स्मिता पोपकर यांचे पथक कोल्हापूरला रवाना झाले. त्यांनी प्रिया हिचा शोध घेत तिला ताब्यात घेतले. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक जिवबा दळवी, पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर तसेच पोलिस पथकाने ही कामगिरी बजावली. या प्रकरणी पोलिसांनी हाती घेतलेल्या पंचनामा व चौकशीअंती हुंडाई वेन्यू जीए 11 ए 7037, ग्रेंड आय 10 जीए 11 ए 6001, व्हेस्पा जीए 11 जे 7291 व एक्टिवा स्कुटर जीए 04 पी 0322 या एकूण 18 लाख रू. किंमतीच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.