खासगी सावकारी, भिशीवरील भिस्त अन् गमावली जाणारी शिस्त
हातात आलेल्या रकमेने भरकटतेय जीवन : कर्जाच्या उचलीने व्याजाच्या गर्तेत आयुष्य, खासगी सावकारी, ऑनलाईन जुगार विरोधातही कारवाई तीव्र करण्याची गरज
बेळगाव : जोशी मळा, खासबाग येथील एकाच कुटुंबातील तिघा जणांच्या आत्महत्येने खासगी सावकारी, पैसे व सोन्याची भिशी आदींवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. एकाच कुटुंबातील चौघा जणांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यापैकी तिघा जणांचा मृत्यू झाला तर एक महिला बचावली. या घटनेवरून आर्थिक विवंचनेमुळे आणखी किती जणांचा बळी जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संतोष गणपती कुर्डेकर (वय 47), बहीण सुवर्णा (वय 52), आई मंगल (वय 85) या तिघा जणांचा बुधवारी 9 जुलै रोजी मृत्यू झाला आहे. संतोषची आणखी एक बहीण सुनंदा (वय 50) ही बचावली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेल्या मृत्यूपत्रामुळे अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. भिशीचा प्रकार कसा चालतो, अशा प्रकारातून एकदा आर्थिक घडी विस्कटली तर आत्महत्येची वेळ कशी येऊन ठेपते, याला जबाबदार कोण, व्यवस्थितपणे गटागटांमध्ये सुरू असलेला व्यवहार कसा बिघडतो? आदी अनेक विषयांवर प्रकाश टाकला आहे.
मृत्यूपत्रात संतोषने केलेल्या उल्लेखामुळे राजेश अच्युत कुडतरकर (वय 52) राहणार केशवनगर, वडगाव, भास्कर ऊर्फ कृष्णा नारायण सोनार (वय 47) राहणार टीचर्स कॉलनी, खासबाग, नानासो हणमंत शिंदे (वय 35) राहणार बिच्चू गल्ली, शहापूर यांना अटक करून पोलिसांनी 661 ग्रॅम सोने, 7 लाख 70 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 56 लाख 70 हजार रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केलेले हे काही पहिले प्रकरण नव्हे. या प्रकरणानंतर आपापसातील विश्वासावर चालणारे आर्थिक व्यवहार, भिशीचे प्रकार आदींवरही चर्चा सुरू झाली आहे. 10 ते 20 जणांचा एक गट एकत्र येऊन पैशांप्रमाणेच सोन्याची भिशी चालवतो. प्रत्येक जण 10 ग्रॅम सोने दिले तरी दहा जणांच्या गटात 100 ग्रॅम सोने जमा होते. गटातील एकट्याला ते सोने मिळते. त्याच्या बदल्यात किरकोळ व्याजही आकारले जाते. त्याचे दागिने बनवून विक्री केली जाते. जेणेकरून एखाद्याचा व्यवसाय यावर चालतो.
कमीत कमी शंभर ग्रॅम सोने घेऊन कारागीर पळाला तरी त्याची भरपाई करण्यासाठी संबंधितांना कर्ज काढावे लागते. कर्ज, त्यानंतर त्याला सुरू होणारे व्याज, चक्रवाढव्याज अशा व्याजांच्या चक्रव्युहात तो गुरफटत जातो. आकडा वाढला की जीवन संपविल्याशिवाय त्याच्यासमोर अन्य पर्याय नसतो. आणखी एक प्रकारामुळे अडचणी वाढतात. अनेकांना कॅसिनोचे व्यसन जडले आहे. वेगवेगळ्या अॅपच्या माध्यमातूनही उघडपणे जुगार सुरू आहेत. जुगार किंवा कॅसिनोत पैसा घातल्यानंतर आर्थिक घडी विस्कटते. त्यावेळीही कर्ज काढावे लागते. पुन्हा व्याज, चक्रवाढव्याजाचा फेरा सुरू होतो. आकडा वाढला की आत्महत्या करण्यापलीकडे अन्य पर्याय नसतो.
बहुतेक व्यवहार विश्वासावर झालेला असतो. त्यामुळे कोणाकडे कसलीच कागदपत्रे नसतात. एकट्याची आर्थिक घडी विस्कटली की त्याचा फटका अनेकांना बसतो. दागिने बनविण्यासाठी दिलेले सोने घेऊन पळून गेलेल्या बंगाली कारागिरामुळे अनेक जण अडचणीत आल्याचे सांगितले जाते. ज्यांच्यात हे नुकसान झेलण्याची ताकद आहे ते यातून निभावतात. नहून एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज असा कर्जाचा फेरा सुरू होतो. एकाच कुटुंबातील तिघा जणांच्या आत्महत्येने सध्या असे अनेक प्रकार ठळक चर्चेत आले आहेत.
गैरधंद्यांविरोधात कारवाईचा सपाटा
केवळ महिनाभरापूर्वी रुजू झालेले पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी बेळगावातील अनेक गैरधंद्यांविरोधात कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. तिघा जणांच्या आत्महत्या प्रकरणानंतर खासगी सावकारीवरही लक्ष ठेवण्याची सूचना त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना केली आहे. व्याज, चक्रवाढव्याजाचा फेरा, वसुलीसाठी होणारे धमकीचे प्रकार, घरापर्यंत येऊन केला जाणारा तमाशा आदी प्रकारांबद्दल थेट कारवाई करण्याची सूचना त्यांनी केली आहे. वसुलीसाठी कोणीही दबाव आणू नये. अशा गोष्टींवर पोलिसांची नजर असणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
- पोलीस आयुक्त भूषण बोरसे