For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खासगी बसेसना शहराबाहेर पिकअप पॉईंटचा पर्याय

11:22 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
खासगी बसेसना शहराबाहेर पिकअप पॉईंटचा पर्याय
Advertisement

पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची खासगी बसचालकांशी चर्चा

Advertisement

बेळगाव : खासगी बसेसमुळे शहरात निर्माण होणारी वाहतूक समस्या दूर व्हावी यासाठी मंगळवारी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी खासगी बसमालक व व्यवस्थापकांची बैठक घेऊन त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. आरटीओ आणि रामदेव हॉटेल सर्कल येथे न थांबता धर्मनाथ सर्कल येथील डबल रोड, भरतेश स्कूलनजीक खुल्या जागेत व महामार्गालगत तीन ठिकाणी पिकअप पॉईंट सुरू केल्यास वाहतुकीची समस्या उद्भवणार नाही, असा सल्ला पोलीस आयुक्तांनी दिला. त्याला उपस्थितांनी होकार दर्शविला आहे. दररोज परगावी लांबपल्ल्याच्या प्रवासाला जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. पोलीस खात्याच्यावतीने करण्यात आलेल्या सर्व्हेदरम्यान बेळगावातून दररोज 79 खासगी बसेस लांबपल्ल्यावर जातात. सकाळी आणि सायंकाळच्यावेळी सदर बसेस आरटीओ सर्कल किंवा रामदेव सर्कल येथे थांबून प्रवाशांना पिकअप करतात.

त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत आहे. विशेष करून शनिवारी आणि रविवारी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे भविष्यात शहरात वाहतूक समस्या उद्भवू नये यासाठी खासगी बसेसना शहराबाहेर पिकअप पॉईंट उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस खात्याकडून प्रयत्न सुरू आहेत. पिकअप पॉईंटसाठी भरतेश स्कूलच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेत, धर्मनाथ सर्कल येथील डबल रोड यासह महामार्गालगत तीन ठिकाणी जागांची पाहणी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी खासगी बसेस चालकांनी पिकअप पॉईंट सुरू केल्यास सोयीचे होईल, असा सल्ला यावेळी पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि वाहतूक व गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजनराजे अरस यांनी दिला. त्याला उपस्थितांनी होकार दर्शविल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. सदर जागांची पाहणी करून पिकअप पॉईंट सुरू झाल्यास शहरात अवजड वाहने येणार नाहीत.

Advertisement

Advertisement
Tags :

.