मळगाव येथे खाजगी बसला अपघात
न्हावेली / वार्ताहर
मुंबई - गोवा महामार्गावरील झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव जोशी मांजरेकरवाडी येथे एका खाजगी बसचा अपघात होऊन ती रस्त्याच्या कडेला कलंडली सुदैवाने अपघातानंतर रस्त्यालगतच्या एका झाडाला ही बस अडकल्याने मोठा अनर्थ टळला आणि या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.अधिक माहिती अशी की,महालक्ष्मी ट्रॅव्हल्सची ही बस ( एम एच ०९ सीजे ३६००) ही गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होती.मळगाव जोशी मांजरेकरवाडी सर्कलनजीक ही बस समोर असलेल्या मारुती ओमनी ( एम एच ०७ एजी ००१७ ) गाडीला पाछीमागून धडकली.धडक दिल्यानंतर बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या डाव्या बाजूला घसरुन कलंडली सुदैवाने रस्त्यालगत असलेल्या अकेशियाच्या झाडाला बस अडकल्यामुळे ती पूर्णपणे उलटली नाही आणि मोठा अपघात टळला.अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरुन फरार झाला.बसमध्ये चालका व्यतिरिक्त क्लिनर आणि इतर तीन प्रवासी होते.अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे.अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि सावंतवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.स्थानिकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले.आणि बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.या मदत कार्यात दिपक जोशी,संजय जोशी,शैलेंद्र पेडणेकर,अजय राऊळ,बाळा आरविंदेकर,शिवम जोशी,यांच्यासह अनेक स्थानिक ग्रामस्थांनी सहभाग घेतला.उशिरापर्यत या अपघाताबाबत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.