प्रीती पवार, प्रिया, अरुंधती अंतिम फेरीत
वृत्तसंस्था, उलानबातार
येथे सुरू असलेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या प्रीती पवारने कोरियाच्या पॅरिस ऑलिम्पिक कांस्यविजेत्या एइजी इमचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला तर अनुभवी निखत झरीन व लवलिना बोर्गोहेन यांचे आव्हान संपुष्टात आले. याशिवाय प्रिया व अरुंधती चौधरी यांनीही उपांत्य फेरीत विजय मिळवून अंतिम फेरी गाठली तर पूजा राणी व अंकुशिता बोरो यांना कांस्यपदकांवर समाधान मानावे लागले.
प्रीती पवार ही दिवसातील भारताची स्टार खेळाडू ठरली. आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य जिंकणाऱ्या प्रीतीने सफाईदार प्रदर्शन करीत तिन्ही फेऱ्यांत वर्चस्व रागात कोरियाच्या इमवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळविला. सुवर्णपदकासाठी तिची लढत चिनी तैपेईच्या हुआंग सिआव वेन हिच्याशी होईल. हुआंग वेन ही तीन वेळची वर्ल्ड चॅम्पियन व 2020 टोकियो ऑलिम्पिकची कांस्यविजेती आहे.
महिलांच्या 60 किलो वजन गटात प्रियाने वर्चस्व गाजविणारा खेळ करीत स्थानिक खेळाडू नमून मोनखोरवर 5-0 अशी मात करून अंतिम फेरीत स्थान मिळविले. सुवर्णपदकासाठी तिची लढत उत्तर कोरियाच्या उन ग्योंग वोन हिच्याशी होईल. महिलांच्या 70 किलो गटात अरुंधती चौधरीने उझ्बेकच्या ओइशा टोइरोव्हाचा 4-1 अशा गुणांनी पराभव केला. अरुंधती ही वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलची सुवर्णविजेती आहे. जेतेपदासाठी तिची लढत कझाकच्या बकीट सीडिश हिच्याशी होईल.
झरीन, बोर्गोहेन उपांत्य फेरीत पराभूत
दोन वेळची वर्ल्ड चॅम्पियन निखत झरीनला महिलांच्या 51 किलो वजन गटाच्या उपांत्य फेरीत चीनच्या विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन वु यू हिच्याकडून 0-5 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. वु यू कडून झालेला तिचा हा दुसरा पराभव आहे. याआधी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून झरीन पराभूत झाली होती. टोकियो ऑलिम्पिक कांस्यविजेत्या लवलिना बोर्गोहेनलाही 75 किलो वजन गटाच्या उपांत्य लढतीत उझ्बेकच्या अझिझा झोकिरोव्हाकडून 0-5 असा पराभव स्वीकारावा लागला. झोकिरोव्हा ही 70 किलो वजन गटाची वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कांस्यविजेती आहे. लवलिनाला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. त्यामुळे तिची ही पहिलीच लढत होती.
पूजा, अंकुशिताला कांस्य
अंकुशिता बोरो चिनी तैपेईच्या निएन चिन चेनकडून 65 किलो वजन गटाच्या लढतीत 0-3 अशा गुणांनी पराभूत झाल्याने तिला कांस्यपदक मिळाले. पहिली फेरी झाल्यानंतर वीजप्रवाह खंडित झाल्याने ही लढत अर्ध्यावरच थांबवण्यात आली आणि गुणांच्या आधारे निकाल निश्चित करण्यात आला. महिलांच्या 80 किलो वजन गटात फक्त तीनच बॉक्सर्सनी भाग घेतला असून उपांत्य फेरीत पूजा राणीला कझाकच्या नादेझदा रायबेट्सकडून 0-5 असा पराभव स्वीकारावा लागला. मंगळवारी मीनाक्षी हुडा (48 किलो) व जस्मिन लंबोरिया (57 किलो) यांच्या उपांत्य लढती होणार आहेत.