पृथ्वीराज पाटील उद्या काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणार
सांगली :
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आणि दोन वेळा विधानसभेचे उमेदवार राहिलेले पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी या निर्णयाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पाटील हे काँग्रेस पक्ष नेतृत्वावर नाराज होते. दोन्ही वेळा झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्यावर अन्याय झाला, तसेच आपल्या विजयात अडथळे निर्माण करण्यात आले, अशी त्यांची तक्रार होती. मात्र, दुसऱ्या वेळी उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी भाजपचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना जोरदार लढत दिली होती.
राजकीय परिस्थिती बदलत असताना, पाटील यांनी पक्षनेतृत्वाकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र, आपली बाजू गांभीर्याने घेतली जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून आपली नाराजी व्यक्त केली होती.
गेल्या आठवड्यात पाटील यांनी भाजपच्या काही नेत्यांची भेट घेऊन पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा केली होती. मात्र काही भाजप नेत्यांच्या विरोधामुळे त्यांच्या प्रवेशाला तात्पुरता ब्रेक लागला. दरम्यान, भाजपने स्वतंत्र कार्यक्रमातून प्रवेश देण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.
सोमवारी रात्री आठ वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण तसेच सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत. ही भेट त्यांच्या भाजप प्रवेशाला अधिकृत मान्यता मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीत काय निर्णय घेतले जातात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी पाटील यांना काँग्रेसमधील पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून बुधवारी अधिकृत घोषणा करण्याचे निश्चित केले आहे. या संपूर्ण घडामोडींबाबत पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.
पृथ्वीराज पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष, माजी खासदार गुलाबराव पाटील यांचे पुत्र आहेत. पक्षातील अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध असले तरी जिल्ह्यातील सध्याच्या राजकारणामुळे त्यांना थांबवणे काँग्रेससाठी अवघड झाले आहे, असे स्पष्ट होत आहे.