पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश टाळला
सांगली :
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा बुधवारी होणारा भाजप प्रवेश टाळला आहे. विधानसभा निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेत एका नेत्या विरोधात केलेले वक्तव्य पाटील यांच्या प्रवेशाला अडथळा ठरले असून मंगळवारी भाजपकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान खरगे यांच्याशी चर्चेनंतर आमदार विश्वजीत कदम यांनीही चर्चा करून त्यांना पक्षात राखण्याचा प्रयत्न केला आहे. पृथ्वीराज पाटील अजून किती दिवस काँग्रेसमध्ये राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मंगळवारी पृथ्वीराज पाटील आणि त्यांचे पुत्र वीरेंद्र यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. भाजप प्रवेशाबाबत यावेळी चर्चा झाली मात्र काही गोष्टींची स्पष्टता झाल्यानंतरच पुढचा निर्णय होईल असे दोन्ही बाजूने बोलले गेले. याचवेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने पृथ्वीराज पाटील यांच्याशी संपर्क साधत काँग्रेस सोडू नका, असे आवाहन केले. त्यानंतर आ. विश्वजीत कदम यांच्याशी श्री. पाटील यांची चर्चा झाली. यामुळे, ते काँग्रेसमध्येच राहणार का भाजपची वाट धरणार याबद्दलचा निर्णय अजून गुलदस्त्यातच आहे. पृथ्वीराज पाटील यांना शिंदे यांच्या शिवसेनेसह व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही ऑफर असल्याचे समजते. गेले काही महिने स्वकियांनी केलेल्या विश्वासघातामुळे आपण अस्वस्थ आहोत असा संदेश पृथ्वीराज पाटील वारंवार पक्षाला देत आहेत. मंगळवारी ते मुंबईला गेल्याने बुधवारी भाजप प्रवेश निश्चित होईल अशा आशेवर असलेले त्यांचे समर्थक शक्ती प्रदर्शनासाठी वाहने जुळवून मुंबईला जाण्याच्या तयारीत होते. मात्र रात्री उशिरा त्यांना प्रवेश पुढे ढकलला गेल्याचा संदेश मिळाल्याने त्यांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.
- विधानसभेतील टीका ठरली अडथळा
दरम्यान पाटील यांना भाजपमध्ये घेणारा काही लोकांनी विरोध केला होता. यामध्ये भाजपमध्ये नव्यानेच प्रवेश केलेल्या जयश्रीताई पाटील यांचाही समावेश असल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीच्या सभेत आघाडीतील एका पक्षाच्या नेत्यावर पृथ्वीराज पाटील यांनी टोकाची टीका केल्याने त्यांना भाजपमध्ये घेऊ नये यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही नेत्यांनी चर्चा केल्याचे आणि त्यानंतर हा प्रवेश पुढे ढकलला गेल्याचे समजते. पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.
- गाडगीळ भेटले प्रदेशाध्यक्षांना
पाटील यांचा प्रवेश होणार की नाही याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असतानाच्या काळातच आ. सुधीर गाडगीळ हे मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटले. त्यांच्या संबंधित व्यक्तींनी कोणालाही विरोध केला नसल्याचे सांगितले. १० ऑगस्ट रोजी मनोज सरगर आणि इतर काही काँग्रेस माजी नगरसेवकांचे प्रवेश करण्यासाठी सांगलीत कार्यक्रम घेण्याबाबत गाडगीळ हे नेत्यांना भेटल्याचे सांगण्यात आले. आपल्याशी चर्चेशिवाय कोणासही पक्षात घेण्यास अप्रत्यक्ष विरोध असल्याची चर्चा आहे. गाडगीळ यांच्यासोबत मुंबईला गेलेल्या अतुल माने यांनी मात्र त्यास नाकारले. विरोध केला नसल्याचे सांगितले.
- नव्या काँग्रेस शहरात जिल्हाध्यक्षाचाही शोध लांबणीवर
काँग्रेसमध्ये पृथ्वीराज पाटील हे पक्ष सोडणारच असे गृहीत धरून शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पेलू शकेल अशा व्यक्तीचा शोध गेल्या काही दिवसांपासून सुरू झाला होता. पक्ष ऐनवेळी कोणाला तरी आपल्या माथ्यावर मारणार आणि आपला बळीचा बकरा होणार त्यापेक्षा आम्ही या पदापासून चार हात दूर राहतो असे काही ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांनी नेत्यांना कळविल्याची चर्चा आहे. पक्षातीलच मदन पाटील समर्थक मात्र पक्ष न सोडलेल्या महापालिकेतील एखाद्या माजी पदाधिकाऱ्याला शहर जिल्हाध्यक्ष केले जाण्याची शक्यता होती. तीही थांबली आहे. आता पाटील यांच्याबाबतीत भाजपने काही निर्णय १० तारखेच्या आधी थेट प्रवेशच दिला तर मात्र काँग्रेसची शोधाशोध पुन्हा सुरू होणार आहे.