पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी
- महेंद्रचे स्वप्न भंगले दुसऱ्यांदा उपमहाराष्ट्र केसरी
फिरोज मुलाणी/ अहिल्यानगर
क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा... कुस्ती शौकिनांचा सळसळत उत्साह... कोण होणार महाराष्ट्र केसरी याची लागलेली उत्सुकता अहिल्यानगरमध्ये रविवारी संपली. पुणे शहरचा बलदंड ताकतीचा पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत पृथ्वीराजने 2 विरुद्ध 1 गुणावर मात करत महाराष्ट्र केसरी किताबाची लढत जिंकली. उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाडने मात्र या निकालावर तीव्र नाराजी व्यक्त करत मैदान सोडल्यामुळे पंचांनी पृथ्वीराजला विजयी घोषित केले.
महाराष्ट्र केसरी किताबाची अंतिम कुस्ती उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार संग्राम जगताप, आमदार माऊली कटके, माजी आमदार अरुणकाका जगताप, कुस्ती संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस, कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस हिंदकेसरी योगेश दोडके, विलास कथुरे यांच्या उपस्थितीत झाली.
बरोबर 8 वाजून 50 मिनिटांनी अंतिम फेरीची लढत सुरू झाली. महेंद्र निळी जर्सी आणि पृथ्वीराज लाल जर्सीत लढत होता. सुरुवातीपासूनच पृथ्वीराज आणि महेंद्र आक्रमक होते. महेंद्र पट काढण्याचा प्रयत्न करत होता तर पृथ्वीराज खेमीची पकड करून गुण मिळवण्याच्या तयारीत होता. पंचांनी महेंद्रला निक्रियतेबद्दल सूचना देऊन गुण घेण्यासाठी सांगितले. मात्र निर्धारित वेळेत तो गुण घेऊ शकला नसल्याने पृथ्वीराजला एक गुण देण्यात आला. त्यानंतर झालेल्या झटापटीत महेंद्रची जर्सी फाटल्यामुळे काही काळ कुस्ती थांबवण्यात आली. नवीन जर्सी परिधान केल्यावर पुन्हा कुस्ती सुरू करण्यात आली. पहिल्या फेरीत प्रयत्न करूनही महेंद्रची पाटी कोरी राहिली. दबाव झुगारून दुसऱ्या फेरीत गुण मिळवण्यासाठी महेंद्र आक्रमक झाला. वारंवार डाव टाकण्याचा त्याचा प्रयत्न पृथ्वीराजच्या बचावामुळे निष्प्रभ ठरला. पंचानी पृथ्वीराजला निक्रियतेबद्दल ताकीद दिली. परंतु त्याला देखील निर्धारित वेळेत गुण मिळवता आला नसल्याने महेंद्रने एक गुण मिळवून बरोबरी साधली. दोघांचे समान गुण झाल्यामुळे कुस्तीत आणखी रंगत निर्माण झाली होती. दोघांचा देखील निर्णायक गुणासाठी कसोशीने प्रयत्न सुरू होता शेवटचे काही क्षण शिल्लक असताना पृथ्वीराजने महेंद्रला झोन बाहेर ढकलून आणखी गुण मिळवून आघाडी वाढवली. परंतु महेंद्रने पंचांच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. पंचांनी महेंद्रला आखाड्यात येऊन कुस्ती करण्यासाठी वारंवार सूचना दिली. परंतु महेंद्रने हरकत नोंदवत मैदान सोडल्यामुळे पंचांनी अखेर पृथ्वीराजला विजयी घोषित केले. पृथ्वीराजला विजयी घोषित करताच त्याच्या चाहत्यांनी जल्लोष करीत आनंद व्यक्त केला.