पृथ्वी चमकला पण मुंबईचा डाव घसरला
पृथ्वी शॉच्या आक्रमक अर्धशतकानंतरही मुंबईच्या दुसऱ्या डावात 6 बाद 153 धावा
वृत्तसंस्था/ लखनौ
येथील एकाना स्टेडियमवर सुरु असलेल्या इराणी चषक क्रिकेट स्पर्धेतील चौथ्या दिवशी मुंबईने दुसऱ्या डावात 6 बाद 153 धावा केल्या आहेत. मुंबईकडे पहिल्या डावातील 121 धावांची आघाडी आहे. या आघाडीच्या जोरावर चौथ्या दिवसअखेरीस 274 धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे. रेस्ट ऑफ इंडियाचा पहिला डाव 416 धावांवर संपुष्टात आला. सामन्याचा आजचा पाचवा व शेवटचा दिवस असून सामना अनिर्णीत राहण्याची शक्यता आहे.
प्रारंभी, रेस्ट ऑफ इंडियाने चौथ्या दिवसाची सुरुवात 4 बाद 289 धावांपासून केली. मात्र रेस्ट ऑफ इंडियाला चौथ्या दिवशी 6 विकेट्सच्या मोबदल्यात 127 धावाच करता आल्या. यामुळे त्यांचा पहिला डाव हा 110 षटकांत 416 धावांवर आटोपल्याने भारताला 121 धावांची आघाडी मिळाली. रेस्ट ऑफ इंडियाकडून अभिमन्यू ईश्वरनने सर्वाधिक 191 धावांची खेळी केली. त्याचे द्विशतक अवघ्या 9 धावांनी हुकले. ध्रुव जुरेलनेही शानदार खेळी साकारताना 93 धावांचे योगदान दिले. इशान किशन याने 38 तर साई सुदर्शन याने 32 धावा केल्या. शेवटच्या 2 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. तिघांनी दुहेरी आकडा गाठण्याआधीच मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर सारांश जैन 9 धावांवर नाबाद परतला. मुंबईकडून तनुष कोटीयन आणि शम्स मुलाणी या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. मोहित अवस्थीने दोघांना मैदानाबाहेर पाठवलं. तर एम खान याने 1 विकेट घेतली.
पृथ्वी शॉचे आक्रमक अर्धशतक
पहिल्या डावात 121 धावांची आघाडी घेतल्यानंतर मुंबईच्या डावाची सुरुवातही शानदार झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ व आयुष म्हात्रे जोडीने अर्धशतकी सलामी दिली. पहिल्या डावात स्वस्तात बाद झालेल्या पृथ्वीने दुसऱ्या डावात मात्र आक्रमक फलंदाजी केली. त्याने अवघ्या 37 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पृथ्वीने 105 चेंडूत 8 चौकार व 1 षटकारासह 76 धावा केल्या. डावातील 34 व्या षटकांत त्याला सांराश जैनने बाद केले. एकीकडे पृथ्वी आक्रमक खेळत असताना दुसरीकडे इतर मुंबईकर फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले. हार्दिक तोमोर, कर्णधार अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर व शम्स मुलाणी स्वस्तात तंबूत परतले. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईने 40 षटकांत 6 विकेट गमावत 153 धावा केल्या होत्या. दिवसअखेरीस सरफराज खान 9 तर तनुष कोटियन 20 धावांवर खेळत होते. मुंबईकडे आता 274 धावांची आघाडी असून आज सामन्याचा पाचवा दिवस आहे.
संक्षिप्त धावफलक
मुंबई प.डाव 537 व दुसरा डाव 40 षटकांत 6 बाद 153 (पृथ्वी शॉ 76, आयुष म्हात्रे 14, रहाणे 9, श्रेयस अय्यर 8, सरफराज खान खेळत आहे 9, तनुष कोटियन खेळत आहे 20, सारांश जैन 67 धावांत 4 बळी, मानव सुतार 2 बळी).
रेस्ट ऑफ इंडिया प.डाव 110 षटकांत सर्वबाद 416 (अभिमन्यू ईश्वरन 191, ध्रुव जुरेल 93, इशान किशन 38, शम्स मुलाणी व तनुष कोटिय प्रत्येकी 3 बळी).
सामना ड्रॉ झाला तर विजेता कोण?
इराणी चषक स्पर्धेत चौथ्या दिवशी मुंबईने पहिल्या डावातील 121 धावांच्या आघाडीच्या जोरावर एकूण 274 धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे. दुसऱ्या डावातही मुंबईची घसरगुंडी उडाली असून आज सामन्याचा पाचवा व शेवटचा दिवस असणार आहे. अशा स्थितीत सामना अनिर्णीत राहण्याची शक्यता जास्त आहे. दरम्यान, नियमांनुसार इराणी चषकाचा सामना अनिर्णित राहिला, तर पहिल्या डावात आघाडी मिळवणाऱ्या संघाला विजेता घोषित केले जाईल. 2018-19 हंगामात विदर्भ आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यातील सामना अनिर्णित राहिला होता, ज्यानंतर पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे इराणी चषकाचा विजेता ठरविण्यात आला. पहिल्या डावातील आघाडीमुळे विदर्भाच्या संघाने विजेतेपद पटकावले होते.