दिल्लीतील साकेत न्यायालय लॉकअपमध्ये कैद्याची हत्या
न्यायालयांच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीच्या साकेत कोर्टात सुनावणीसाठी आणलेल्या दोन कैद्यांमध्ये रक्तरंजित हाणामारी झाली. कोर्टाच्या परिसरातील लॉकअपमध्ये झालेल्या या हिंसक चकमकीत एका कैद्याला आपला जीव गमवावा लागला. मृताचे नाव अमन (24) असे असून तो गोविंदपुरी, दिल्ली येथील रहिवासी आहे. घटनेवेळी लॉकअपमध्ये अनेक अंडर ट्रायल कैदी (यूटीपी) उपस्थित होते. अमनवर हल्ला करणाऱ्यांची ओळख जितेंद्र उर्फ जित्ते आणि जयदेव उर्फ बच्चा अशी झाली आहे. हल्ल्याचे कारण जुने वैमनस्य असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने पुन्हा एकदा न्यायालयांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
दिल्लीतील साकेत कोर्टाच्या लॉकअपमध्ये गुरुवार, 5 जून रोजी कैद्यांच्या दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत जखमी झालेल्या कैद्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत अमनविरुद्ध कलम 307/34 आयपीसी अंतर्गत एफआयआर क्रमांक 250/2017 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2024 मध्ये जितेंद्र आणि अमन तुरुंगाबाहेर असताना भांडण झाले होते. त्यावेळी अमनने जितेंद्र आणि त्याच्या भावावर चाकूने हल्ला केला होता. याच वैमनस्यातून कोर्ट लॉकअपमध्ये त्याचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या घटनेनंतर कोर्ट आवारात खळबळ उडाली. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घटनेची माहिती समजताच वरिष्ठ अधिकारीही तात्काळ पोहोचले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू करण्यात आला आहे.