जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचे कळंबा कारागृहातून पलायन
कोल्हापूर
कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये जन्मठेपीची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने शुक्रवारी दुपारी पलायन केले. वजीन नानसिंग बारेला (वय 41) असे त्याचे नाव आहे. या घटनेनंतर कारागृह प्रशासन घडबडून जागे झाले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. या माहितीवरून जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी संयुक्तपणे कैदी वजीन बारेला याची शोध मोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत त्याचा पोलिसांना ठावठिकाणा लागलेला नव्हता. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कैदी वजीन बारेला हा मुळचा मध्यप्रदेशातील असून, तो शेतीचे कामे करतो आहे. शेतीच्या कामाच्या शोधात तो धुळयामध्ये आला. भोरखेडा (ता. शिरपूर) येथील भटेसिंग राजपूत यांच्या शेतात तो काम करत होता. याच दरम्यान त्याच्या हातून खूनाची घटना घडली. या गुह्यात धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला 30 नोव्हेंबर 2018 मध्ये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याची नाशिक रोड कारागृहात रवानगी केली. नाशिक रोड कारागृहातून त्याला 18 जुलै 2024 रोजी कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात हलविले. न्यायालयाने शिक्षा ठोठाविल्यापासून त्याची वागणूक चांगली असल्याने, कारागृह प्रशासनाकडून त्याला कारागृहाच्या शेतीकामाबरोबर गुरे चारण्याकरीत अन्य कैद्यांसोबत नेले जात होते. शुक्रवारी सकाळी तो सहकारी कैद्यांच्याबरोबर कारागृहाबाहेर शेतात जनावरे चारण्यासाठी आला होता. याचदरम्यान त्याने सहकारी कैद्यांना शौचालयाला जावून येतो, असे सांगून झाडाच्या आडोशाला गेला.
तो बराच वेळ झाला तरी परत आला नसल्याचे सहकारी कैद्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती कारागृह सुरक्षा रक्षक धीरज शिंदेना दिली. त्यांनी अन्य कैद्याच्या मदतीने त्याचा कारागृहाच्या शेतीमध्ये शोध घेतला. पण तो मिळून आला नाही. त्यामुळे शिंदे यांनी याची माहिती कारागृह प्रशासन आणि पोलिसांना दिली. त्यावरून कारागृहाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यासह जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख संतोष गळवे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, श्वान पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
कैदी बारेला शोधासाठी जिह्यात नाकाबंदी करून, पोलिसांची वेगवेगळी पथके तयार केली. या पथकाने कारागृह परिसररासह शेंडा पार्क, चित्रनगरी, गिरगाव, कंदलगाव, पाचगाव, कळंबा कत्यायणी मंदिर, कणेरी, कणेरीवाडी आदी भागात आणि शहरातील रेल्वे स्टेशन, एसटी बस स्थानक, शेंडा पार्क परिसरातील पडीक इमारती आदी ठिकाणी शोध घेतला. पण त्याचा रात्री उशिरा पर्यंत शोध लागलेला नाही.