पर्वरी उड्डाणपुलाचे प्रवेश-निर्गमन मार्ग सुरक्षितपणे सुरू करण्यास प्राधान्य, आयआयएम टीमने केली पाहणी
पणजी : पर्वरी येथील नव्या उन्नत मार्गाच्या प्रवेश आणि निर्गमन मार्गांबाबत निर्माण झालेल्या सुरक्षेच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (IIM) पथकाने पर्वरी उड्डाणपुलाची पाहणी केली असून, स्थानिक नागरिकांसाठी उड्डाणपूल आणि अटल सेतूचे प्रवेश-निर्गमन मार्ग सुरक्षितपणे खुले करणे हे सध्या प्राधान्य असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे.
उड्डाणपुलाच्या काही प्रवेश-निर्गमन मार्गांवर सध्या निर्बंध लागू आहेत. अपघातानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने हे निर्बंध लागू करण्यात आले होते. तसेच उड्डाणपुलावर दुचाकींच्या वाहतुकीवरही बंदी घालण्यात आली आहे.
IIM पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून वाहतुकीची सद्यस्थिती, प्रवेश-निर्गमन मार्गांची रचना आणि वाहनांच्या हालचालींचा आढावा घेतला. स्थानिक नागरिकांना उड्डाणपुलाचा तसेच अटल सेतूचा सुरक्षितपणे वापर करता यावा, यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.
पुढील ४८ तासांत काही प्राथमिक उपाययोजना करण्यात येणार असून, त्यानंतर काही दिवसांत दुसऱ्या टप्प्यात अधिक व्यापक सुधारणा केल्या जाणार आहेत. प्रवेश-निर्गमन मार्ग सुरक्षित करण्यासोबतच वाहतूक व्यवस्थेत आवश्यक बदल करण्यावरही भर दिला जाणार आहे.
पर्वरी उन्नत मार्ग सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेचा पुनर्विचार सुरू केला आहे. प्रवेश-निर्गमन मार्ग बंद केल्याने सेवा रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढल्याचेही वृत्त आहे.
आता IIM पथकाच्या पाहणीनंतर करण्यात येणाऱ्या तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांकडे पर्वरीवासीयांचे लक्ष लागले आहे.