महारोगच्या उच्चाटनाला प्राधान्य द्या
जागतिक आरोग्य संघटनेचे साऱ्या देशांना आवाहन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महारोगाच्या उच्चाटनाला सर्व देशांच्या प्रशासनांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केले आहे. महारोगाच्या फैलावावर लक्ष ठेवण्यासाठी, या रोगावरच्या उपचारांसाठी आणि या व्याधीच्या रुग्णांना आधार आणि त्यांची काळजी घेण्यासाठी निधी पुरेसा उपलब्ध करुन द्यावा, अशीही सूचना या संघटनेने तिच्या सोमवारी प्रसारित केलेल्या प्रसारणामध्ये केले आहे.
प्रत्येक वर्षाच्या जानेवारी महिन्यातील शेवटचा सोमवार हा जागतिक महारोग निवारण दिन म्हणून पाळला जातो. या दिनी जगात अनेक देशांमध्ये महारोगासंबंधी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हा रोग प्रामुख्याने उष्णकटीबंधीय प्रदेशामध्ये आढळतो आणि तो बऱ्याच देशांकडून दुर्लक्षित केला गेला आहे. त्यामुळे काही देशांमध्ये या रोगाच्या रुग्णांची संख्या वाढताना आढळून येत आहे.
सायमा वाजेद यांचे वक्तव्य
जागतिक आरोग्य संघटनेच्या अग्नेय आशिया विभागाच्या प्रादेशिक संचालिका सायमा वाजेद यांनी साऱ्या विश्वसमुदायाला या रोगाच्या विरोधात एकत्रित संघर्ष करण्याचे आवाहनही केले. या रोगाविषयी बरेच गैरसमज आणि न्यूनगंड आहेत. या रोगासंदर्भात चुकीच्या माहितीचाही प्रसार झाल्याने त्याच्याविरुद्धचा संघर्ष जटील बनला आहे. या रोगातून पूर्ण बरे झालेल्यांनाही समाजाकडून वाळीत टाकले जाते. तसेच त्यांची कुटुंबेही एकाकी पाडली जातात. आज या रोगावर अनेक औषधे उपलब्ध आहेत. हा रोग पूर्ण बरा करण्याइतकी प्रगती करण्यात आली आहे. तरीही अनेक आव्हाने आजही आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
100 देशांमध्ये अधिक रुग्ण
2023 मध्ये जगातील 100 देशांमध्ये या रोगाचे 1 लाख 82 हजार 815 रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यापैकी 95 टक्के रुग्ण 23 देशांमध्ये आहेत. साधारणत: 5 टक्के नव्या रुग्णांवर वेळीच उपचार न झाल्याने त्यांना शारिरीक व्यंगांशी झगडावे लागत आहे. तर नव्या रुग्णांपैकी 5.6 टक्के बालके या व्याधीने ग्रस्त झाली आहेत. काही देशांमध्ये बालकांमध्ये हा रोग झपाट्याने पसरत असून 30 टक्के वाढ नोंदली गेली आहे. ही चिंतेची बाब असली तरी, उपचारांमध्येही प्रगती झाल्याने आशादायक परिस्थिती आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
नवे जागतिक धोरण
2021 मध्ये महारोगासंबंधी नवे जागतिक धोरण स्वीकारण्यात आले आहे. या धोरणानुसार 2021 ते 2030 या 10 वर्षांच्या काळात या रोगाचे उच्चाटन करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. रोगाचे उन्मूलन, रोगामुळे होणाऱ्या शारिरीक व्यंगाचे निर्मूलन आणि रुग्णांविरोधात होणाऱ्या पक्षताचा अंत असे हे धोरण आहे.