For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सार्वजनिक शौचालये, कचरा व्यवस्थापन, रस्ते दुरुस्तीस प्राधान्य द्या

07:18 AM Jul 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
सार्वजनिक शौचालये  कचरा व्यवस्थापन  रस्ते दुरुस्तीस प्राधान्य द्या
Advertisement

नगरविकास मंत्री डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या यांची सूचना : सुवर्णसौधमध्ये महापालिका, बुडाच्या प्रगती आढावा बैठक

Advertisement

प्रतिनिधी

बेळगाव

Advertisement

महापालिका व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारितील सार्वजनिक शौचालयांची नियमित देखभाल करून ती नागरिकांसाठी स्वच्छ, सुरक्षित व वापरयोग्य ठेवावीत. आवश्यक ठिकाणी नवीन शौचालयांची उभारणी करावी. त्याचबरोबर घराघरांतून कचरा संकलन, घनकचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन व विल्हेवाट प्रक्रियेला सर्वोच्च प्राधान्य देऊन शहर अधिक स्वच्छ व आरोग्यदायी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना नगरविकास मंत्री डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या यांनी दिल्या.

मंगळवारी सुवर्णसौधमधील व्हिडिओ कॉन्फरन्स सभागृहात आयोजित बेळगाव महापालिका व नगरविकास प्राधिकरणाच्या प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत शहरातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेऊन त्यांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

इंदिरा पॅन्टीन 2.0ची कामे गतीने पूर्ण करा

बेळगाव शहरात इंदिरा पॅन्टीन 2.0 योजनेंतर्गत सुरू होणाऱ्या केंद्रांसाठी निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. गरीब, कामगार, विद्यार्थी व गरजू नागरिकांना स्वस्त दरात दर्जेदार भोजन मिळावे, यासाठी ही योजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. शहरातील इंदिरा पॅन्टीनचे व्यवस्थापन महापालिकेने जबाबदारीने हाताळून स्वच्छता, अन्नाचा दर्जा व सेवा यामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ई-खात्यातील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करा

महापालिका व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू करण्यात आलेल्या ई-खाता प्रणालीतील तांत्रिक त्रुटींमुळे नागरिकांना अडचणी येत असल्याच्या तक्रारींची दखल घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्या तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले. नागरिकांना विनाविलंब ई-खाता सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी आवश्यक ती कार्यवाही त्वरित करावी, असे त्यांनी सांगितले.

एल अॅण्ड टीने त्वरित रस्ते दुऊस्त करावे

शहरात पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी एल अॅण्ड टी कंपनीने अनेक ठिकाणी रस्ते खोदले असून काम पूर्ण झाल्यानंतरही रस्त्यांची दुऊस्ती झालेली नाही. यामुळे वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका व नागरिकांची गैरसोय वाढल्याचे निदर्शनास आले आहे. अशा सर्व रस्त्यांची तातडीने दुऊस्ती करून वाहतुकीसाठी खुले करावेत. महापालिकेने एल अॅण्ड टी कंपनीशी समन्वय साधून ही कामे निश्चित कालावधीत पूर्ण करण्याची सूचनाही यतिंद्र यांनी दिल्या.

स्मार्ट सिटीची प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करा

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू असलेली रस्ते, गटार, फुटपाथ, पादचारी सुविधा आणि इतर पायाभूत विकासकामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून ती नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध करून द्यावीत. मंजूर झालेली सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.

मोकळ्या भूखंडांचे वाटप, ई-ऑफिसची अंमलबजावणी

नगरविकास प्राधिकरणाने विकसित केलेल्या भागांतील उपलब्ध मोकळ्या भूखंडांचे नियमानुसार वाटप करावे. तसेच कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक व कागदविरहित करण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले.

पाणीपुरवठ्यासाठी आराखडा तयार करा

पुढील दहा वर्षांतील शहराची लोकसंख्या आणि वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन पिण्याच्या पाणीपुरवठ्याचा दीर्घकालीन कृती आराखडा तयार करण्याचे आदेश शहर पाणीपुरवठा व सांडपाणी मंडळाला देण्यात आले आहे. त्याचबरोबर शहरातील डेनेज व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठीही आवश्यक सुधारणा करण्यासही त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार आसिफ सेठ, महापौर प्रिती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाली, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, महापालिका आयुक्त एम. कार्तिक, स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका कविता, जिल्हा नागरीविकास युनिटचे योजना संचालक मल्लिकार्जुन कलादगी, महापालिका उपायुक्त उदयकुमार तळवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.