पिण्याचे पाणी पुरवठ्यास प्राध्यान्य द्या
जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे : जिल्हा जल-स्वच्छता मिशन समितीची बैठक
बेळगाव : उन्हाळी हंगामात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी सर्व गावांना समर्पक व नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करावा. ग्राम पंचायत क्षेत्रातील पिण्याच्या पाणीपुरवठ्याबाबत येणाऱ्या अडचणींचे निरीक्षण करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अभियंत्यांची नियुक्ती करावी. संबंधित अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक ग्राम पंचायत कार्यालयांच्या फलकांवर किंवा भिंतींवर स्पष्टपणे लिहिण्यात यावेत. अधिकारी व अभियंत्यांनी ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यास प्राध्यान्य द्यावे, अशी सूचना जि. पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली.
गुऊवारी आयोजित जिल्हा जल व स्वच्छता मिशन समिती बैठकीत ते बोलत होते. शिंदे म्हणाले, पिण्याचे पाणी व स्वच्छतेसंदर्भात नागरिकांकडून तक्रारी आल्यास संबंधित अभियंत्यांना जबाबदार धरले जाईल. अभियंत्यांनी सक्रियपणे काम करून तक्रारींना तात्काळ प्रतिसाद देऊन पंचायत विकास अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून काम करावे. सर्व गावांमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घ्यावेत. पाण्याच्या टँकरची नियमित स्वच्छता करून तारीख नोंदवावी. पाणी दूषित होऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. साथीचे रोग पसरू नयेत म्हणून दक्षता बाळगावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे
ग्रा. पं. स्तरावर पंचायत विकास अधिकारी व अभियंते, तसेच तालुकास्तरावर कार्यकारी अधिकारी आणि साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी समन्वयाने काम करावे. ग्राम पंचायतींनी आरओ प्लांट हस्तांतरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. एखाद्या गावात पाणीपुरवठा खंडित झाल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. अत्यावश्यक असल्यासच बोअरवेल खोदण्याचा निर्णय घ्यावा. बहुग्राम पाणीपुरवठा योजनांसाठी धरणांतील पाणीसाठ्याची दररोज माहिती घ्यावी. जेणेकरून पाणीपातळी समजून घेण्यास मदत होईल, अशी सूचनाही शिंदे यांनी दिली. बैठकीस योजना संचालक रवी बंगारप्पन्नवर, उपसचिव (प्रशासन) बसवराज हेग्गनायक, मुख्य नियोजन संचालक गंगाधर दिवटर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कार्यकारी अभियंता किरण घोरपडे, चिकोडी विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंगराव यांच्यासह ता. पं. कार्यकारी अधिकारी, साहाय्यक अभियंते, कर्मचारी उपस्थित होते.
प्रत्येक शनिवारी श्र्रमदानाचे आयोजन करा
ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पाणी बचत व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी दर शनिवारी आपल्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये श्र्रमदान उपक्रमात सहभागी व्हावे. सर्व गावांमध्ये योग्य पद्धतीने कचरा व्यवस्थापन करावे. कचऱ्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पाण्याचे स्रोत व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित पाहणी करावी, असेही शिंदे यांनी सांगितले.