अधिवेशन काळात शिस्त, वेळेला प्राधान्य द्या
जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची पूर्वतयारी बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना : कर्मचाऱ्यांनी आपले मोबाईल स्वीच ऑफ न करता सुरू ठेवावेत
बेळगाव : मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही सुवर्णसौधमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत असून अधिवेशन सुरळीतपणे होण्यासाठी अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कार्य करत रहावे. जिल्हा पंचायत व त्याच्या अखत्यारित येणाऱ्या खात्याच्या कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून कार्य करावे. शिस्त आणि वेळेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केले. जिल्हा पंचायत सभागृहात गुरुवार दि. 5 रोजी झालेल्या पूर्वतयारी बैठकीमध्ये अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. अधिवेशनाच्या निमित्ताने सुवर्णसौधमधील विविध खोल्यांवर नियोजित करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने कामे करावीत. लायजन ऑफिसर म्हणून नेमणूक झालेल्या अधिकाऱ्यांनी राज्यातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून ते अधिवेशनासाठी येणाऱ्या तारखांची खातरजमा करून घ्यावी. वरिष्ठ अधिकारी अधिवेशनासाठी आल्यानंतर त्यांना निवासाबरोबर इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. लॅपटॉप, इंटरनेट यासारख्या व्यवस्था वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळेत उपलब्ध करून द्याव्यात.
अधिवेशनच्या निमित्ताने जबाबदारी देण्यात आलेल्या जि. पं. च्या कर्मचाऱ्यांनी सक्रिय रहावे. शनिवार व रविवारी कर्मचाऱ्यांनी आपले मोबाईल स्वीच ऑफ न करता सुरू ठेवावेत. स्वीच ऑफ करून ठेवल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, असा इशाराही सीईओ शिंदे यांनी दिला. जिल्ह्यात उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले कॅफे, नूतन जि. पं. इमारत, सायन्स पार्क आदींचे काम अपूर्ण असल्यास ते त्वरित पूर्ण करण्यात यावे. हिवाळी अधिवेशन पूर्वतयारी बैठकीला गैरहजर असलेल्या जि. पं. चे कर्मचारी व अधिवेशन कामासाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची सूचना जि. पं. सचिवांना (प्रशासन) राहुल शिंदे यांनी दिली. जि. पं. चे योजना संचालक रवी बंगारेप्पनवर, उपसचिव (प्रशासन) बसवराज हेग्गनायक, उपसचिव (विकास) बसवराज अडवीमठ, मुख्य लेखापाल परशुराम दुडगुंटी, मुख्य योजनाधिकारी गंगाधर दिवटर, बेळगाव-चिकोडी विभागाचे कार्यकारी अभियंते, अन्य अधिकारी व कर्मचारी पूर्वतयारी बैठकीला उपस्थित होते.