मुद्रक बांधवांनी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करावे
डॉ. किरण ठाकुर यांचे प्रतिपादन : बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनची सभा
बेळगाव : मुद्रण व्यवसाय टिकविण्यासाठी व सध्याच्या आधुनिक युगात छपाईचे काम दर्जेदार व नवीन पद्धतीचे होण्यासाठी मुद्रक बांधवांनी आधुनिक तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे. छपाई करण्यासाठी नवीन मशिनरी, नवनवीन तंत्रज्ञान यांची माहिती घेऊन आपल्या मुद्रण व्यवसायात प्रगती केली पाहिजे, असे प्रतिपादन तऊण भारतचे समूहप्रमुख डॉ. किरण ठाकुर यांनी टिळकवाडी येथे व्यक्त केले. दि बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा व नूतन संचालक मंडळाची निवड असा संयुक्त कार्यक्रम बुधवार दि. 4 रोजी सायंकाळी लायन्स भवन, टिळकवाडी येथे झाला. यावेळी कार्यक्रमाच्या व निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. किरण ठाकुर बोलत होते. बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनच्या सर्व मुद्रक बांधवांनी संघटित राहून कार्य केले पाहिजे. तसेच एकमेकांना सहकार्य करून मुद्रण व्यवसाय समृद्ध केला पाहिजे.
आधुनिक तंत्रज्ञान आणि मशीन यांची माहिती घेण्यासाठी बाहेरच्या देशातीलही व्यवसायासंदर्भात माहिती मिळविली पाहिजे. तसेच जर्मनमधील मुद्रण व्यवसाय कशा पद्धतीने सुरू आहे याबद्दलही डॉ. किरण ठाकुर यांनी सविस्तर माहिती दिली. प्रारंभी अध्यक्ष राजेंद्र भातकांडे यांनी सर्व मुद्रकांचे स्वागत केले व वर्षभराच्या संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर संतोष होर्तीकर यांनी 2024-25 सालचा वार्षिक ताळेबंद सादर केला. याला सर्वानुमते संमती देण्यात आली. यानंतर 2025-27 सालाकरिता दोन वर्षांच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारी संचालक मंडळाची निवड करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे-अध्यक्ष राजेंद्र भातकांडे, उपाध्यक्ष विलास सावगावकर, सेव्रेटरी संतोष होर्तीकर, उपसेव्रेटरी बाळू कदम, संचालकपदी अशोक धोंड, नंदकुमार देशपांडे, सतीश जाधव, श्रीधर (बापू) जाधव, रघुनाथ राणे, श्याम मांगले, अजित कोळेकर, महेंद्र सावगावकर,रवींद्र सावंत यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे स्वागत डॉ. किरण ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर अशोक धोंड यांनी बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनसाठी सर्व मुद्रक बांधवांनी कशा पद्धतीने कार्य केले पाहिजे, याबद्दल मार्गदर्शन केले.