नव्या शैक्षणिक वर्षाला मुख्याध्यापकांचा पाठिंबा
शिक्षकांचा संघटनेचे मात्र विरोध
पणजी : पुढील शैक्षणिक वर्ष 2025-26 हे येत्या 1 एप्रिलपासून सुरु करण्याच्या सरकारी निर्णयाचे गोवा मुख्याध्यापक संघटनेने स्वागत केले आहे. या उलट अखिल गोवा माध्यमिक शिक्षक संघटनेने त्या निर्णयास विरोध दर्शवून घाईघाईने लावलेल्या सदर निर्णयाचा फेरविचार करावा, असे सूचवले आहे. मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष लिबरेथा फर्नांडिस यांनी हा निर्णय म्हणजे प्रगतीसाठी पुढे टाकलेले एक पाऊल असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो तसेच त्यास पाठिंबा देतो. त्यामुळे चांगले बदल घडून येतील. शाळेतील वातावरण अधिक कार्यक्षम होईल. त्यामुळे इयत्तेचा एकूण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पुरेशी वेळ मिळणार आहे. एप्रिल हा तसा शिक्षकांना कार्यशील ठेवणारा महिना आहे. ते सदर महिन्यात दहावीची परीक्षा, पेपर तपासणी यात मग्न असतात. काही शाळा दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी जादा शिकवणीचे वर्ग एप्रिलमध्ये घेतात. तेव्हा शैक्षणिक कामासाठी एप्रिल महिना अधिकृत ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
वाईट परिणाम होणार : व्हिक्टोरिया
अखिल गोवा माध्यमिक शिक्षक संघटना अध्यक्ष सुरज व्हिक्टोरिया यांनी सांगितले की, हा निर्णय घाईने घेण्यात आला असून त्याचे वाईट परिणाम विद्यार्थी, शिक्षकांवर तसेच एकंदरित शिक्षण प्रणालीवर दिसून येणार आहेत. एप्रिलमध्ये नवीन शिक्षण वर्ष सुरु होणार म्हणजे मार्चमध्ये वर्ष संपुष्टात येणार. त्यामुळे फेब्रुवारीला परीक्षा घ्याव्या लागतील. शाळा, दहावी परीक्षा, उत्तरपत्रिका तपासणी, त्यांचे निकाल हे सर्व एप्रिल महिन्यात डोईजड होणार असल्याने तो निर्णय मागे घ्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे.