भाजपकडून युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांनी महायुतीतील भाजपकडून सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी शुक्रवारी १२ वाजण्याच्या सुमारास उमेदवारी अर्ज दाखल केला . नगरपालिकेच्या निवडणूक कक्षामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्याने नगरपालिकेत पहिली एंट्री केली. भाजप तर्फे महायुतीतून युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांना उमेदवारी देण्यासंदर्भात बोलणी सुरू असतानाच त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचारातही आघाडी घेतली आहे . यावेळी सावंतवाडी संस्थांनचे राजे खेमसावंत भोसले, शुभदा देवी भोसले, भाजप प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष लखम सावंत भोसले, तसेच भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान , भाजपची उमेदवार यादी व एबी फॉर्म येत्या दोन दिवसात जाहीर होणारआहेत . मात्र ऑनलाईन प्रक्रियेमुळे नगराध्यक्ष पदासाठी श्रद्धा सावंत भोसले यांचा अर्ज आज दाखल करण्यात आला आहे. आज नगरसेवक पदासाठी नऊ जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.नगराध्यक्ष पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने सीमा मठकर व भाजप -महायुतीच्या माध्यमातून श्रद्धा सावंत भोसले असे दोघाजणांचे अर्ज दाखल झाले आहेत.