मुख्य 27 जिल्ह्यांसाठी ‘पंतप्रधान गतिशक्ती’ योजना
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची माहिती : सक्षम नियोजनावर भर
नवी दिल्ली :
देशामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी देशातील 27 महत्त्वाकांक्षी जिह्यांमध्ये पायाभूत सुविधांच्या नियोजनासाठी पीएम गतिशक्ती उपक्रमांतर्गत जिल्हा मास्टर प्लॅन सादर केला असल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी दिली आहे.
पायाभूत सुविधा प्रकल्पांचे कार्यक्षम नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी पंतप्रधान गतिशक्ती उपक्रमांतर्गत राष्ट्रीय मास्टर प्लॅन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. हे पोर्टल गुजरातमधील बीआयएसएजी-एन (भास्कराचार्य इन्स्टिट्यूट फॉर स्पेस अॅप्लिकेशन्स अँड जिओइन्फॉर्मेटिक्स) ने विकसित केले आहे. जीआयएस-सक्षम प्लॅटफॉर्म सरकारसाठी पैसे वाचविण्यात मदत करेल आणि त्याच्या डेटा-बॅक्ड निर्णय प्रक्रियेमुळे पायाभूत सुविधांचे अधिक दक्षतेने नियोजन करेल, असेही मंत्री गोयल यांनी म्हटले आहे.
गोयल म्हणाले की, पुढील 18 महिन्यांत देशभरातील 750 हून अधिक जिह्यांचा समावेश करण्यासाठी जिल्हा मास्टर प्लॅनचा विस्तार केला जाणार आहे. यासह त्यांनी शहरांना त्यांच्या लॉजिस्टिक योजना तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या जलद, उत्तम आणि किफायतशीर नियोजनासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर 1,600 पेक्षा जास्त डेटा संकलित करण्यात आला आहे.
असे तंत्रज्ञान असेल ज्याचा वापर जग आपल्या पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यासाठी पुढील वर्षांमध्ये करेल व भारताचे शहरी नियोजक, वास्तुविशारद, अभियंते यांच्यासह अनेक प्रकल्पांना वित्तपुरवठा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांचा भारताच्या पायाभूत प्रकल्पांवर विश्वास असल्याचेही मंत्री गोयल यांनी स्पष्ट केले आहे.