पंतप्रधानांची कच्छमध्ये जवानांसोबत दिवाळी
वृत्तसंस्था/कच्छ, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला दीपोत्सव कच्छच्या रणात सैनिकांसह साजरा केला आहे. सैनिकांसमवेत दीपावली साजरी करण्याची ही त्यांची सलग 11 वी वेळ आहे. 2014 मध्ये देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी आपली दिवाळी देशाच्या विविध भागांमध्ये सीमेवर कार्यरत असणाऱ्या सैनिकांसह साजरी केली आहे. कच्छमधील सर क्रीक येथे भारत-पाकिस्तान सीमेच्या नजीक त्यांनी सैनिकांसह दीपावलीचा प्रथम दिन साजरा केला. त्यांनी सीमेवरील सैनिकांना मिठाई आणि फळे दिली. तसेच देशसीमांच्या संरक्षणासाठी ते करीत असलेल्या अहोरात्र परिश्रमांकरिता त्यांची प्रशंसा केली. हा कार्यक्रम लकी नाला परिसरात झाला. हा प्रदेश अत्यंत दुर्गम असून येथे गस्त घालणे आव्हानात्मक असते, असे तज्ञांनी स्पष्ट केले आहे. लकी नाला हा परिसर सर क्रीकचा प्रारंभीचा बिंदू आहे. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांसह काही तास दीपोत्सवाचा आनंद घेतला.