वायनाड भूस्खलनग्रस्तांची पंतप्रधानांनी घेतली भेट
हवाई सर्वेक्षणानंतर पीडितांशी चर्चा : मुख्यमंत्र्यांकडूनही घेतला आढावा
वृत्तसंस्था/ वायनाड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, 10 ऑगस्ट रोजी केरळमधील वायनाड येथील भूस्खलनग्रस्त भागाचा दौरा केला. सकाळी 11 वाजता ते विशेष विमानाने कन्नूर विमानतळावर पोहोचले. कन्नूरहून मोदी सकाळी 11.15 वाजता भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने वायनाडला गेले. त्यांनी मार्गात भूस्खलनग्रस्त चुरामाला, मुंडक्काई आणि पुंचिरिमट्टम गावांचे हवाई सर्वेक्षण केले. 30 जुलैच्या रात्री विनाश सुरू झालेल्या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर त्यांनी आपद्ग्रस्तांची भेट घेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांनी मुख्यमंत्री विजयन आणि केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांच्याकडेही बऱ्याच प्रश्नांची विचारणा करत घटनेचा सविस्तर आढावा घेतला.
आपल्या वायनाड दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींचे हेलिकॉप्टर वायनाडमधील कालपेट्टा येथे उतरले. त्यानंतर वेलराम येथील शाळेलाही त्यांनी भेट दिली. या शाळेत 582 विद्यार्थी होते, त्यापैकी 27 विद्यार्थी दरड कोसळल्यानंतर बेपत्ता आहेत. पंतप्रधानांनी शाळेत 15 मिनिटे घालवली. कालपेट्टा येथून मोदींनी रस्त्याने भूस्खलनग्रस्त भागात जाऊन बचावकार्याची माहिती घेतली. तसेच त्यांनी मदत छावण्या आणि ऊग्णालयांमध्ये पीडितांची भेट घेतली. बचाव मोहिमेदरम्यान भारतीय लष्कराने बांधलेल्या चुरलमला येथील 190 फूट लांबीच्या बेली ब्रिजलाही भेट दिली.
अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक
पीडितांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि इतर अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. बैठकीत त्यांना अपघात आणि बचाव कार्याची माहिती देण्यात आली. पंतप्रधानांसोबत वायनाडला गेलेले केंद्रीय मंत्री सुरेश गोपीही या बैठकीला उपस्थित होते. विविध भागांचा दौरा पूर्ण केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेत पंतप्रधान मोदी संध्याकाळी कन्नूरला परतले. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले.
पंतप्रधानांच्या वायनाड दौऱ्याच्या एक दिवस आधी शुक्रवारी केरळ सरकारने पुनर्वसन आणि मदत कार्यासाठी केंद्राकडे 2,000 कोटी ऊपयांची आर्थिक मदत मागितली होती. वायनाडमध्ये, मुंडक्काई, चुरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा गावात 29 जुलै रोजी पहाटे 2 ते 30 जुलै रोजी पहाटे 4 दरम्यान भूस्खलन झाले. यामध्ये आतापर्यंत 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 138 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. 9 दिवस बचावकार्य केल्यानंतर, 8 ऑगस्ट रोजी लष्कर वायनाडहून परतले. सध्या एनडीआरएफ बचावकार्य करत आहे.
राहुल गांधींनी मानले पंतप्रधानांचे आभार
विरोधी पक्षनेते आणि वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी वायनाड भेटीबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. ‘एक्स’वर त्यांनी पंतप्रधानांचा वायनाडला जाण्याचा निर्णय चांगला असल्याचे नमूद केले. मला खात्री आहे की जेव्हा पंतप्रधान स्वत: भूस्खलनामुळे झालेला विध्वंस पाहतील तेव्हा ते ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. वायनाड दुर्घटनेला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी राहुल यांनी संसदेत केली होती. राहुल-प्रियांका गांधी यांनी 1 ऑगस्टला वायनाडला भेट दिली होती.