डिसेंबरमध्ये कॅनडाच्या दौऱ्या जाणार पंतप्रधान
भारत-कॅनडा संबंधांना मिळणार नवे वळण : व्यापार करारावर होणार शिक्कामोर्तब
वृत्तसंस्था, न्यूयॉर्क
संयुक्त राष्ट्रसंघ महासभेसाठी न्यूयॉर्कच्या दौऱ्यावर पोहोचलेले कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डिसेंबरमध्ये कॅनडाचा दौरा करू शकतात असे म्हटले आहे. तसेच दोन्ही देश चालू वर्षाच्या अखेरपर्यंत व्यापार कराराला अंतिम रुप देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
भारतासोबतचे संबंध कॅनडासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. दोन्ही देशांदरम्यान व्यापार चर्चेत चांगली प्रगती होत असल्याचे वक्तव्य कार्नी यांनी न्यूयॉर्कमध्ये पत्रकारांशी बोलताना केले आहे.
भारत आणि कॅनडादरम्यान संबंध अनेक स्तरांवर अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. यात लोकांदरम्यान संबंध, सुरक्षेचा मुद्दा आणि व्यापार तसेच आर्थिक संबंध सामील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डिसेंबरमध्ये कॅनडाचा दौरा करतील. दोन्ही देश चालू वर्षाच्या अखेरपर्यंत व्यापार करारापर्यंत पोहोचण्याच्या दिशेने काम करत असल्याचे कार्नी यांनी म्हटले आहे.
चर्चेला वेग
केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी अलिकडेच भारत-कॅनडादरम्यान प्रस्तावित व्यापक आर्थिक भागीदारी करारावरील चर्चेला वेग मिळाल्याचे सांगितले होते. दोन्ही देशांनी चर्चेला पुढे नेण्यावर सहमती दर्शविली आहे. दोन्ही देशांदरम्यान चर्चेची पुढील फेरी 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मुंबईत मागील आठवड्यात कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिद्धू यांच्यासाब्sात चौथ्या फेरीतील चर्चा अत्यंत उत्पादक राहिल्याचे गोयल यांनी सांगितले आहे.
पुढील 90 दिवस महत्त्वाचे
दोन्ही देशांनी चर्चेला वेग देण्याचा निर्णय घेतला असून याच्या अंतर्गत भारतीय टीम पाचव्या फेरीतील चर्चेसाठी पावले टाकणार आहे. कॅनडासोबत चर्चेत प्रगती होत असताना चर्चेचा वेगही वाढत आहे. भारत-कॅनडा संबंधांच्या दृष्टीकोनातून आगामी 90 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे गोयल यांनी म्हटले आहे.
एक दशकापासून प्रयत्न
भारत आणि कॅनडादरम्यान व्यापक व्यापार करारावरून एक दशकापेक्षा अधिक काळापासून चर्चा सुरू आहे. दोन्ही देशांनी मार्च 2022 मध्ये औपचारिक स्वरुपात चर्चा पुन्हा सुरू केली होती. याचबरोबर अंतरिम पाऊल म्हणून अर्ली प्रोग्रेस ट्रेड अॅग्रिमेंटवरही काम केले जात होते. 2022 आणि 2023 दरम्यान दोन्ही देशांदरम्यान चर्चेच्या 9 फेऱ्या पार पडल्या होत्या. परंतु ऑगस्ट 2023 मध्ये दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याने ही प्रक्रिया रोखण्यात आली होती.
2025 मध्ये चर्चा पुन्हा सुरू
भारत आणि कॅनडादरम्यान व्यापार चर्चा 2025 साली जी20 शिखर परिषदेदरम्यान पुन्हा सुरू झाली. दोन्ही देशांच्या राजनयिक संबंधांमधील तणाव दूर झाल्यावर हे पाऊल उचलण्यात आले. त्यापूर्वी कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडात हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणी भारतावर बिनबुडाचे आरोप केले होते.