‘बिम्सटेक’साठी पंतप्रधान आज बँकॉकला जाणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बंगाल इनिशिएटिव्ह फॉर टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशनची सहावी शिखर परिषद 4 एप्रिल रोजी बँकॉकमध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील परिषदेत सहभागी होण्यासाठी गुरुवारी म्हणजेच 3 एप्रिल रोजी बँकॉकला रवाना होतील. या परिषदेपूर्वी 2 एप्रिल रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आणि 3 एप्रिल रोजी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे.
वाढत्या भू-राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सहाव्या बिम्सटेक शिखर परिषदेमुळे बंगालच्या उपसागरात सहकार्यासाठी प्राथमिक प्रादेशिक मंच म्हणून संघटनेची भूमिका बळकट होण्याची अपेक्षा आहे. पाच दक्षिण आशियाई आणि दोन आग्नेय आशियाई देशांसह बिम्सटेक प्रादेशिक बाबींमध्ये अधिक गतिमान आणि प्रभावशाली देश बनण्यास भारत सज्ज आहे. 1997 मध्ये स्थापनेपासून बिम्सटेकने पाच शिखर परिषदा आयोजित केल्या आहेत. कोलंबो येथे झालेल्या शेवटच्या शिखर परिषदेनंतर तीन वर्षांनी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची थीम ‘समृद्धता, लवचिकता आणि बिम्सटेक’ अशी ठेवण्यात आली आहे. प्रादेशिक एकात्मता आणि आर्थिक सहकार्यासाठी ही परिषद महत्त्वाची असते. व्यापक अजेंड्यासह सामान्य सुरक्षा आणि विकास आव्हानांना तोंड देणे हे शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे.