भारतीय समुद्र सप्ताह परिषदेत आज पंतप्रधानांची उपस्थिती
पणजी : मुंबईत दि. 27 पासून प्रारंभ झालेल्या भारतीय समुद्र सप्ताह 2025 परिषदेत आज बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी 4 वाजता पंतप्रधान या परिषदेला संबोधित करणार आहेत. या परिषदेत 85 पेक्षा अधिक देशांमधील एक लाखापेक्षा अधिक प्रतिनिधी, 500 पेक्षा जास्त प्रदर्शक आणि 350 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय वत्ते सहभागी झाले आहेत. दि. 31 रोजी परिषदेचा समारोप होणार आहे.
सागरी अमृत काल व्हिजन 2047 शी सुसंगत या महत्त्वाकांक्षी, भविष्याभिमुख सागरी परिवर्तनासाठी वचनबद्ध असलेल्या व बंदर-केंद्रित विकास, शिपिंग तसेच जहाज बांधणी, निर्बाध वाहतूक व्यवस्था प्रणाली आणि सागरी कौशल्य-निर्मिती या धोरणात्मक स्तंभांवर उभा असलेला हा दीर्घकालीन दृष्टीकोन भारताला जगातील आघाडीच्या सागरी शक्तींमध्ये समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवून आहे.
आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमात ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरम अर्थात जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी मंचामध्ये जागतिक सागरी कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रमुख गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि आंतरराष्ट्रीय भागिदार एकत्र आले आहेत. त्याद्वारे शाश्वत सागरी विकास, लवचिक पुरवठा साखळी, हरित नौवहन आणि समावेशक नील अर्थव्यवस्था, आदी धोरणांवर संवाद साधण्यात येणार आहे.