सोमवारपासून पंतप्रधान फ्रान्स-अमेरिका दौऱ्यावर
12-13 फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या आठवड्यात फ्रान्स आणि अमेरिकेचा दौरा करणार आहेत. ‘एआय’ शिखर परिषदेच्या निमित्ताने ते 10 आणि 11 फेब्रुवारी रोजी फ्रान्समध्ये असतील. त्यानंतर ते अमेरिकेला रवाना होतील. या दौऱ्यात ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट असेल. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रपती निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल फोनवरून अभिनंदन केले होते.
पंतप्रधान मोदी 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर रवाना होतील. तेथूनच ते 12 फेब्रुवारीपासून दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीत दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांवर विस्तृत चर्चा करतील. यामध्ये इंडो-पॅसिफिक, संरक्षण सहकार्य, व्यापार आणि प्रादेशिक सुरक्षा यावर भर दिला जाणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली.
10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान फ्रान्सचा दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) शिखर परिषदेचे सह-अध्यक्षपद भूषवतील. राजनयिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 फेब्रुवारी रोजी सकाळी एआय अॅक्शन कॉन्फरन्स होणार आहे. फ्रान्सने भारताला या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवण्यासाठी आमंत्रित केले आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एआय शिखर परिषदेला ‘अॅक्शन समिट’ म्हटले आहे. परिषदेचे सह-अध्यक्षपद भूषवल्यानंतर पंतप्रधान मोदी पॅरिसमधील सीईओ फोरममध्ये शीर्ष फ्रेंच कंपन्यांच्या सीईओंनाही भेटतील. ते फ्रान्सच्या मार्सिले शहरात राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा देखील करतील. दोन्ही नेते जागतिक मुद्यांवरही चर्चा करतील.
पंतप्रधान मोदींचा हा फ्रान्सचा सहावा अधिकृत दौरा आहे. एआय परिषदेचे सह-अध्यक्षपद भूषवण्याव्यतिरिक्त पंतप्रधान 12 फेब्रुवारी रोजी फ्रेंच सरकारने आयोजित केलेल्या व्हीव्हीआयपी डिनरला देखील उपस्थित राहतील. शिखर परिषदेदरम्यान एआय फाउंडेशनचेही उद्घाटन होण्याची अपेक्षा आहे.