पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्तगाळीला येणार
28 रोजी श्रीरामाच्या भव्य मूर्तीचे अनावरण करणार
प्रतिनिधी/ काणकोण
श्री गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठाच्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवानिमित्त पर्तगाळी येथे श्री प्रभू रामचंद्राच्या 77 फूट उंचीची मूर्ती उभारण्याचे काम सध्या नेटाने चालू झाले असून 27 नोव्हेंबर ते 7 डिसेंबरपर्यंत या ठिकाणी भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर श्रीरामाच्या मूर्तीचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सध्या मठ प्राकाराचे सुशोभिकरण तसेच मठ वास्तूच्या नूतनीकरणाचे काम चालू असून दिवसाकाठी 600 ते 700 कामगार या ठिकाणी काम करत आहेत. नुकत्याच आलेल्या बिगरमोसमी पावसामुळे काही प्रमाणात कामावर परिणाम झालेला असला, तरी पावसाची तमा न बाळगता नियोजित वेळेत कामे पूर्ण करण्याची जोरदार तयारी आयोजन समितीने ठेवली आहे.
यंदाच्या चतुर्मास व्रतासाठी वाराणसी या ठिकाणी मुक्काम राहिलेले मठाधीश प. पू. श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांचे 1 रोजी मठात आगमन झाले असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी येणार आहेत. त्यांच्या हस्ते या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भव्य श्री प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचे मठाधीश श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराज आणि मठ समितीचे प्रमुख यांच्या उपस्थितीत अनावरण होणार आहे. त्यादृष्टीने एकंदर कार्यक्रमाची जोरदार तयारी या ठिकाणी चालू आहे.
जवळजवळ 11 दिवस या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून दर रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या 11 दिवसांत तीन ते चार लाख भाविक, अनुयायी या ठिकाणी उपस्थित राहणार असून पंतप्रधान मोदी यांचे या ठिकाणी आगमन होणार असल्यामुळे एकंदर कार्यक्रमाला वेगळेच वळण मिळाले आहे आणि संपूर्ण परिसर त्याकरिता उल्हासित झाला आहे.