पंतप्रधान नरेंद्र मोदी नायजेरिया दौऱ्यावर
7 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांचा दौरा : द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर भर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, अबुजा
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नायजेरियाला रवाना झाले. राष्ट्राध्यक्ष अहमद टिनुबू यांच्या निमंत्रणावरून ते प्रथमच नायजेरियाला भेट देत आहेत. तसेच गेल्या 17 वर्षात कोणत्याही भारतीय पंतप्रधानांची नायजेरियाला ही पहिलीच भेट असेल. नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी 2007 मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी नायजेरियाला भेट दिली होती.
पंतप्रधान मोदी रविवारी राष्ट्रपती टिनुबू यांची भेट घेणार आहेत. भारत-नायजेरिया द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर त्यांच्यात चर्चा होईल. यानंतर मोदी राजधानी अबुजामध्ये भारतीय समुदायाच्या लोकांनाही संबोधित करतील. नायजेरियामध्ये 150 हून अधिक भारतीय कंपन्या असून त्यांची उलाढाल 2 लाख कोटींहून अधिक आहे.
तेल आणि वायूच्या प्रचंड साठ्यामुळे नायजेरिया हा आफ्रिकेतील एक महत्त्वाचा देश आहे. हा देश भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करतो. ऊर्जा, खाणकाम, औषधनिर्माण आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये आफ्रिकेतील भारतीय गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. नायजेरिया देश ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज (ओआयसी) आणि ऑर्गनायझेशन ऑफ ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीजचे (ओआयपीसी) महत्त्वाचा सदस्य आहे. भारताच्या मुत्सद्देगिरी आणि आर्थिक धोरणासाठी या दोन्ही संस्था महत्त्वाच्या आहेत.
स्वातंत्र्यानंतर भारताने आफ्रिकन देशांच्या स्वातंत्र्याचे जोरदार समर्थन केले होते. नायजेरियाच्या स्वातंत्र्यापूर्वीच दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध सुरू झाले होते. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सप्टेंबर 1962 मध्ये नायजेरियाला भेट दिल्यानंतर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा पाया रचला गेला होता.