पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबर रोजी उडुपीत
बेंगळूर : बिहार विधानसभा निवडणुकीच्या आखाड्याला रंग आला आहे. सध्या निवडणूक प्रचारात व्यग्र असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात कर्नाटक दौऱ्यावर येणार आहेत. 28 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला भेट देतील. येथे होणाऱ्या लक्ष कंठ गीता पारायण-बृहत् गीतोत्सव कार्यक्रमात ते सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 28 नोव्हेंबर रोजी दुपारी उडुपीत पंतप्रधानांचे आगमन होईल. श्रीकृष्ण मठात प्रसाद स्वीकारल्यानंतर ते सुगुणेंद्र तीर्थ श्रीपाद यांच्याशी संवाद साधतील. नंतर लक्ष कंठ गीता पारायण-बृहत् गीतोत्सवात सहभागी होतील. मोदींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर उडुपी श्रीकृष्ण मठात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींच्या उडुपी दौऱ्याविषयी पंतप्रधान कार्यालयाने पुष्टी केली आहे. सर्व आवश्यक व्यवस्था सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. श्रीकृष्ण मठ व पुत्तीगे मठ यांच्या संयुक्त विद्यमाने 8 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे.