For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी बेळगावात

12:07 PM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी बेळगावात
Advertisement

बेळगाव-चिकोडी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांसाठी भव्य सभा : अनिल बेनके यांची माहिती

Advertisement

बेळगाव : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवार दि. 28 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगावमध्ये येत आहेत. बेळगाव व चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एकत्रितरित्या भव्य सभा बी. एस. येडियुराप्पा मार्ग येथील मालिनी सिटी येथे होणार आहे. यावेळी दोन लाखाहून अधिक नागरिक उपस्थित राहतील, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. भाजपच्या माध्यम कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेविषयी माहिती देण्यात आली. बेळगाव मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर व चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारासाठी भव्य सभा घेतली जाणार आहे. सकाळी 11.30 वाजता नरेंद्र मोदी बेळगावमध्ये दाखल होणार आहेत. दुपारी 12 वाजता सभेला संबोधित करणार आहेत. यासाठी भाजपकडून जय्यत तयारी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

या सभेवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र, माजी मुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुराप्पा, राज्य निवडणूक प्रभारी राधामोहन तसेच बेळगाव जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मालिनी सिटी येथे सभेसाठी भव्य मंडप उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याचे अॅड. एम. बी. जिरली यांनी सांगितले. यावेळी विधानपरिषद सदस्य हनुमंत निराणी, माजी आमदार संजय पाटील, भाजपच्या महानगराध्यक्षा गीता सुतार यांसह इतर उपस्थित होते. उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बेळगाव जिल्हात सभा व्हावी यासाठी जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रयत्नशील होते. परंतु नरेंद्र मोदी यांच्या देशभर प्रचारसभा होत असल्याने निश्चित वेळ मिळत नव्हती. अखेर सभेची तारीख निश्चित करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा बेळगावमध्ये येणार आहेत. मागील वर्षी नुतनीकरण करण्यात आलेल्या बेळगाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगावमध्ये आले होते. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा मोदी बेळगावमध्ये येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.