For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदी यांची ‘थ्रिप्रयार’ मंदिराला भेट

06:51 AM Jan 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदी यांची ‘थ्रिप्रयार’ मंदिराला भेट
Advertisement

वृत्तसंस्था / थ्रिसूर

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केरळमधील सुप्रसिद्ध थ्रिप्रयार मंदिराला भेट दिली. रामायणात या मंदिराचे विशेष महत्व आहे. केरळच्या दोन दिवसांच्या भेटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी रात्री या राज्यात पोहचले. केरळची राजधानी थिरुवनंतपुरम येथे यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

थ्रिप्रयार मंदिर रामस्वामी मंदिर म्हणून ओळखले जाते. तेथे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजाआर्चा केली. या मंदिराचे प्रभू रामचंद्रांच्या संदर्भात मोठे महत्व आहे. या मंदिरात प्रभू रामचंद्रांची मूर्ती ही मुख्य असून अन्य देवतांच्या मूर्तीही आहेत. येथील रामाची मूर्ती ही विष्णूप्रमाणे चतुर्भुज आहे. या राममूर्तीच्या एका हातात सुदर्शन चक्र आणि एका हातात धनुष्य आहे. या राममूर्तीमध्ये शिव आणि विष्णू यांचेही दर्शन होते. त्यामुळे ती या तीन्ही देवांचे दर्शन एकाचवेळी घडविते. अशी रामाची मूर्ती अन्यत्र कोठे नाही, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

Advertisement

दक्षिणेतल्या मोठ्या मंदिरांपैकी एक

रामस्वामी मंदीर हे दक्षिण भारतात असणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. येथील राममूर्ती ‘खर संहारक मूर्ती’ म्हणून ओळखली जाते. रामाने खर आणि दूषण नामक राक्षसांचा वध केला होता. त्या घटनेला अनुसरुन ही मूर्ती ओळखली जाते. या मूर्तीच्या गळ्यात हारही आहे. त्यामुळे तिची ओळख ब्रम्हा, विष्णू आणि महेश या तीन्ही मुख्य देवांच्या रुपात आहे.

स्वागतासाठी मुख्यमंत्री उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केरळ दौरा सुरु झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी केरळचे राज्यपाल अरीफ मोहम्मद खान, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन, भारतीय जनता पक्षाच्या केरळ शाखेचे अध्यक्ष, तसेच या पक्षाचे नेते प्रकाश जावडेकर आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन आदी नेते विमानतळावर उपस्थित होते.

गुरुवायूरच्या मंदिरात दर्शन

बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थ्रिसूर येथील जगप्रसिद्ध गुरुवायूर मंदिराला भेट दिली. हे भगवान कृष्णाचे मंदीर आहे. तेथे त्यांनी भगवान कृष्णाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन पूजापाठ केला. या तीर्थस्थळाचा उल्लेख ‘भूलोक वैकुंठ’ असा केला जातो. या मंदिराच्या दर्शनाची माहिती त्यांनी ‘एक्स’वर प्रसिद्ध केली.

रामदर्शनासाठीही दक्षिण भारताचा दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दक्षिण भारत दौरा तीन दिवसांपूर्वी सुरु झाला आहे. या दौऱ्यात त्यांनी केरळच्या आधी आंध्र प्रदेशलाही भेट दिली होती. अनेक प्रकल्पांचे राष्ट्रार्पण करण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असले तरी, दक्षिण भारतातील प्रभू रामचंद्रांच्या देवस्थानांना भेटी देणे हाही एक उद्देश आहे. अयोध्येत होणार असलेल्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आहे.

भव्य रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत केरळमध्ये करण्यात आले आहे. त्यांनी कोचीमध्ये एका भव्य रोड शोमध्येही भाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहण्यासाठी मार्गाच्या दोन्ही बाजूंना मोठा जनसमुदाय उपस्थित होता. हा त्यांचा दोन दिवसांचा केरळ दौरा असून हा त्यांचा या राज्याचा दुसरा दौरा आहे. त्यांनी 4 हजार कोटी रुपयांच्या जनहित प्रकल्पांचे उद्घाटन बुधवारी केले. कोची येथे नवा ड्रायडॉक, आंतरराष्ट्रीय नौका दुरुस्ती प्रकल्प, इंडियन ऑईल कंपनीचे एलपीजी आयात केंद्र यांचा समावेश या प्रकल्पांमध्ये आहे. हे प्रकल्प पूर्ण झाले असून त्यांच्यामुळे देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोलाची भर पडली आहे, अशी माहिती देण्यात आली. धर्म आणि अर्थ या दोन्ही क्षेत्रात भारताची प्रगती झाली पाहिजे, असे हे धोरण असून देशात धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींचा दक्षिण भारत दौरा

ड या दक्षिण भारत दौऱ्याला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची पार्श्वभूमी

ड दक्षिण भारतात जनहित प्रकल्पांच्या उद्घाटनाबरोबच रामदर्शनाचीही संधी

ड आर्थिक विकास आणि धर्म अशा दोन्ही मार्गांवर असण्याची आवश्यकता

Advertisement
Tags :

.