For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदी यांचा ‘स्वदेशी’ पुढाकार

07:00 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदी यांचा ‘स्वदेशी’ पुढाकार
Advertisement

विवाह आदी भारतातच साजरे करण्याचे आवाहन

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

श्रीमंत, सुखवस्तू भारतीय नागरीकांनी त्यांचे किंवा त्यांच्या कुटुंबियांचे वाढदिवस, विवाह आदी कार्यक्रम भारतातच साजरे करावेत, असे ‘स्वदेशी’ ला प्राधान्य देणारे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आपण जितके आत्मनिर्भर होऊ आणि जितका स्वदेशीचा स्वीकार करु, तितकी देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट होणार आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले आहे. भारतीय नागरीकांनी त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि उत्तम व्यवहारांमुळे नुकत्याच संपलेल्या आर्थिक तिमाहीत देशाचा विकासदर 7.8 टक्के इतका उत्कृष्ट पातळीवर नेला आहे. तो आणखी बळकट व्हायचा असेल, तर स्वदेशीचे जास्तीत जास्त आचरण आवश्यक आहे. भारतीयांनी यांच्या कार्यक्रमांसाठी भारतातील स्थळे निवडावीत. तसेच सोन्याची खरेदी आवश्यक असेल तरच करावी. यामुळे देशातील पैसा देशातच राहून अर्थव्यवस्थेला अधिक हातभार लागेल. परकीय चलनाचा अपव्यय होणार नाही. आपल्याला सुटीचा आनंद घ्यायचा असेल, तर भारतात तशी स्थाने अनेक आहेत. त्यांची निवड करा, अशीही सूचना त्यांनी केली आहे.

Advertisement

स्वदेशी आणि स्वयंपूर्णता

जितक्या अधिक प्रमाणात आपण स्वदेशीचा स्वीकार करु, तितक्या अधिक प्रमाणात आपण स्वयंपूर्ण होणार आहोत. आपल्या अर्थव्यवस्थेला सातत्याने भक्कम अवस्थेत ठेवायचे असेल, तर आपल्याला हे करावे लागणार आहे. आपण अधिकाधिक क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भरता स्वीकारावयास हवी. आज आपल्या देशात उत्तम गुणवत्तेच्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. त्यांचा अधिकाधिक उपयोग करणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, अशा अर्थाचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.

विकासदर अपेक्षेपेक्षाही अधिक

मध्यपूर्वेतील अस्थिर परिस्थिती, तिचे जागतिक अर्थव्यवस्थेवर होत असलेले विपरीत परिणाम, वाढती महागाई आदी आव्हाने असूनही भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर 2026-2027 च्या आर्थिक वर्षाच्या प्रथम तिमाहीत 7.8 टक्के इतका राहिला. रिझर्व्ह बँकेने 7 टक्क्यांचे अनुमान व्यक्त केले होते. प्रत्यक्षात तो त्याहीपेक्षा अधिक राहिला. ही बाब भारताची आर्थिक धोरणे योग्य दिशेने जात आहेत, याची द्योतक आहे. हे श्रेय समस्त भारतीय नागरीकांचे आहे. त्यांनी देश आणि धोरणे यांच्यावर दाखविलेला विश्वास या यशाला कारणीभूत आहे. ही प्रगती अशीच राखायची असेल, तर ‘स्वदेशी’चा अवलंब अधिकाधिक प्रमाणात करणे, देशाचे चलन वाचविणे, परकीय चलनात घट होऊ न देणे आणि आर्थिक विकासाचा वेग अधिक वाढविणे, हे कर्तव्याचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement
Tags :

.