आफ्स्पा पूर्ण हटवण्याचे पंतप्रधान मोदींचे संकेत
ईशान्येकडील हिंसाचार 75 टक्के कमी झाल्याचा दावा : आसाम दौऱयात कॅन्सर रुग्णालयांचे लोकार्पण
गुवाहाटी / वृत्तसंस्था
आसाममध्ये शांतता परत येत असल्याने नियमही बदलले जात आहेत. हिंसाचार कमी झाल्याने सरकारने आता आफ्स्पा (आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट) कायद्याचे क्षेत्र कमी केले आहे. ईशान्येकडील हिंसाचाराच्या घटनांमध्ये 75 टक्के घट झाली आहे. सबका साथ, सबका विकास या भावनेने आज सीमेशी संबंधित समस्यांवर तोडगा काढला जात आहे. आसाम आणि मेघालय यांच्यात झालेला करार इतर बाबींनाही प्रोत्साहन देईल. यामुळे संपूर्ण प्रदेशाच्या विकासाच्या आकांक्षांना चालना मिळेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आसाममध्ये केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी दिब्रुगढमधील खनीकर मैदानावर 7 नवीन कर्करोग रुग्णालयांची पायाभरणी केली. तसेच 6 कर्करोग रुग्णालयांचे उद्घाटन केले. कर्करोग ही केवळ आसाममध्येच नाही तर ईशान्येतही मोठी समस्या आहे. गरीब आणि मध्यमवर्गियांना कॅन्सरचा सर्वाधिक फटका बसतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. याचदरम्यान, बऱयाच काळापासून ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये आफ्स्पा आहे, परंतु गेल्या 8 वर्षांमध्ये कायमस्वरूपी शांतता आणि उत्तम कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीमुळे आम्ही ईशान्येकडील अनेक भागांमधून आफ्स्पा हटवले आहे, असे पंतप्रधानांनी गुरुवारी आपल्या आसाम दौऱयादरम्यान स्पष्ट केले.
‘शांतता, एकता आणि विकास’ रॅलीला संबोधित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी कार्बी आंगलाँग जिह्यातील दिफू येथे अमृत सरोवर प्रकल्पाची पायाभरणी केली. व्यासपीठावर पोहोचण्यापूर्वी पंतप्रधान सुरक्षेचे कडे तोडून उपस्थित लोक आणि मुलांशी हस्तांदोलन करताना निदर्शनास आले. त्यानंतर पंतप्रधान मोदी व्यासपीठावर भाषणासाठी उभे राहताच उपस्थितांनी टाळय़ांचा कडकडाट केला. हे दृश्य पाहून, पूर्वी येथे बॉम्ब आणि गोळय़ांचे आवाज ऐकू येत होते आणि आज टाळय़ांचा कडकडाट, जयघोष होत असल्याने समाधान वाटत असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.
आसामच्या जलद विकासासाठी प्रयत्नशील
आसाममध्ये कायमस्वरूपी शांतता आणि जलद विकासासाठी झालेल्या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी काम केले जात आहे. भाजपचे डबल इंजिन सरकार तरुणांना नवीन संधी देण्यासाठी कटिबद्ध आहे. आसाममध्ये 2,600 हून अधिक अमृत सरोवर बांधण्याचे काम सुरू आहे. हे लोकसहभागातून केले जात आहे, असे भाषणादरम्यान पंतप्रधान म्हणाले. 2014 पासून, ईशान्येतील अडचणी कमी होत आहेत, लोकांचा विकास होत आहे. आज जेव्हा कोणी आसामच्या आदिवासी भागात किंवा ईशान्येकडील इतर राज्यांत जातो तेव्हा त्यालाही परिस्थिती बदललेली दिसते असे पंतप्रधान म्हणाले.
स्थानिक स्वराज्यावर लक्ष केंद्रित जेव्हा मी तरुणांना जंगलातून शस्त्र घेऊन आपल्या कुटुंबाकडे परतताना पाहतो, तेव्हा त्या मातांच्या डोळय़ात आनंद दिसतो तेव्हा मला धन्य वाटते. बोडो करार असो किंवा कार्बी आंगलाँग करार असो, आम्ही स्थानिक स्वराज्यावर भर दिला आहे. गेल्या 7-8 वर्षांपासून केंद्र सरकारचे स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण करून त्यांना अधिक पारदर्शक बनवण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे, असेही मेदी म्हणाले.