पंतप्रधान मोदींच्या मातोश्री उद्या 100 वर्षांच्या होणार
गांधीनगरमध्ये त्यांच्या नावाने मार्ग निर्माण करण्याची योजना
गांधीनगर / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन या उद्या, अर्थात शनिवारी (18 जून 2022) वयाची शंभरी पार करणार असून त्या निमित्त गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये एका मार्गाची निर्मिती करण्याची महानगरपालिकेची योजना आहे. पंतप्रधान मोदीही शनिवारी आपल्या मातेचे अभिष्टचिंतन करण्यासाठी राज्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
हीराबेन या हीराबा या आदरार्थी संबोधनाने ओळखल्या जातात. त्यांचा जन्म 18 जून 1922 या दिवशी झाला होता. त्यामुळे येत्या शनिवारी त्या 100 वर्षांच्या होत आहेत. त्यांच्या नावाने एक मार्ग असावा ही जनतेची मागणी आहे. त्यानुसार महानगरपालिका असा मार्ग बनविणार आहे, अशी माहिती महापौर हितेश मकवाना यांनी दिली आहे. हा मार्ग रायसण येथील पेट्रोलपंपापासून 80 मीटरपर्यंत असेल. अशा प्रकारे हीराबेन यांचा सन्मान केला जाणार आहे.
वडनगरमध्ये कार्यक्रम हीराबेन यांची शंभरी पार झाल्याच्या कारणास्तव त्यांचे घर असणाऱया वडनगर येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कुटुंबियांनी केले आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यांचे जवळपास सर्व कुटुंबियही या कार्यक्रमाला येणार आहेत, अशी माहिती गुजरात भाजपच्या कार्यालयाने दिली आहे.