पंतप्रधान मोदींची कन्याकुमारीत ध्यानधारणा
भगवती अम्मन मंदिरात घेतले दर्शन : विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये 45 तासांपर्यंत करणार ध्यान
वृत्तसंस्था /कन्याकुमारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी संध्याकाळी तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथे पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदी हे येथे 45 तासांपर्यंत ध्यानधारणा करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी प्रथम येथील भगवती अम्मन मंदिरात पूजा केली आणि तेथून ते विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पोहोचले. 1 जून रोजी कन्याकुमारी येथून रवाना होण्यापूर्वी मोदी हे तेथील संत तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याला भेट देत नमन करू शकतात. समुद्रामधील स्मारकावर पंतप्रधान मोदींच्या 45 तासांच्या दौऱ्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी हे गुरुवारी संध्याकाळपासून 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत ध्यान मंडपममध्ये ध्यान करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या कन्याकुमारी दौऱ्यादरम्यान तेथे सुमारे 2000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तर भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाकडून देखील सुरक्षेवर देखरेख ठेवली जात आहे. गुरुवारपासून शनिवारपर्यंत समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. तसेच खासगी नौकांना तेथे जाण्याची अनुमती दिली जाणार नाही. कन्याकुमारी हे भारताचे दक्षिणेकडील टोक आहे. येथे हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र परस्परांमध्ये सामावले जातात. पंतप्रधान मोदींनी निवडणूक प्रचार मोहिमेच्या अखेरीस अध्यात्मिक यात्रेवर जाण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी 2019 मध्ये पंतप्रधान मोदींनी देवभूमी उत्तराखंडच्या केदारनाथ येथे जात गुहेत ध्यानधारणा केली होती. तर 2014 मध्ये मोदींनी महाराष्ट्रातील प्रतापगडचा दौरा केला होता. काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या ध्यानधारणेला काँग्रेसने राजकीय स्टंट ठरविले आहे. काँग्रेसने याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. पंतप्रधान मोदींच्या कन्याकुमारी येथील दौऱ्याचे अन् ध्यानधारणेचे वृत्तवाहिन्यांवर थेट प्रसारण करण्यावर बंदी घातली जावी अशी मागणी काँग्रेससमवेत अन्य विरोधी पक्षांनी आयोगाकडे केली होती.