पंतप्रधान मोदींचे ‘महाकुंभ’स्नान
संगमावर मंत्रोच्चारांसोबत ध्यानसाधना : देशवासियांच्या कल्याणासाठी प्रार्थना :
वृत्तसंस्था/ प्रयागराज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात सहभागी होत पवित्र त्रिवेणी संगमावर श्रद्धेचा वर्षाव केला. भगव्या रंगाचे कपडे परिधान करून मोदींनी संगमस्नान केल्यानंतर गंगेला नमन केले आणि सूर्यदेवाला नैवेद्य दाखवला. त्यांनी संगमाच्या काठावर गंगेची पूजा केली आणि देशवासियांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. पंतप्रधान मोदींचा संगम दौरा सुमारे 2 तासांचा होता. सकाळी 11 ते 11:30 ही वेळ पंतप्रधान मोदींसाठी राखीव होती. पंतप्रधानांच्या महाकुंभ भेटीची विशेष तयारी करण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी प्रयागराज कुंभमेळ्यातील त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी पोहोचले. या महासोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी प्रयागराज विमानतळावर उतरून थेट हेलिकॉप्टरने डीपीएस शाळेच्या मैदानावर पोहोचले. यानंतर, पंतप्रधान अरैल घाटावरून बोटीने संगम नाक्यावर पोहोचले. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते. पंतप्रधान नेहमी एसपीजीच्या विशेष सुरक्षा कवचात असतात. त्यांच्यासाठी व्हीव्हीआयपी प्रोटोकॉल पाळला जातो. म्हणजेच पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान परिसरात सामान्य लोकांना प्रवेश बंदी असते. परंतु महाकुंभमेळ्यादरम्यान तसे झाले नाही. 29 जानेवारीच्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मोदींच्या आगमनामुळे सामान्य लोकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी अतिशय स्मार्ट प्रोटोकॉल बनवण्यात आला. पंतप्रधानांच्या जवळजवळ दोन तासांच्या भेटीदरम्यान आणि संगम स्नानादरम्यान मुख्य जत्रेच्या परिसरात वाहतूक बदलावी लागली नाही किंवा सामान्य लोकांचे स्नान थांबवावे लागले नाही.
प्रयागराजमधील पवित्र स्नानाचे क्षेत्र 4000 हेक्टर क्षेत्रफळ आकारात 25 क्षेत्रांमध्ये विभागले गेले आहे. येथे 41 घाट असून तेथे भाविकांची मोठी गर्दी असते. याचदरम्यान मोदींच्या स्नानासाठी येथे एक खास योजना देखील आखण्यात आली होती. स्टीमरने संगमच्या मध्यभागी असलेल्या प्लॅटफॉर्मवर पोहोचत पंतप्रधानांनी डुबकी मारली. यानंतर ते तिथून अरैल घाटाकडे परतले. त्यामुळे रस्ते किंवा घाट बंद करावे लागले नाहीत. सामान्य लोक नेहमीप्रमाणे स्नान करत राहिले.
38 कोटींहून अधिक भाविकांचे स्नान
महाकुंभाला भाविकांचे आगमन अजूनही सुरूच आहे. आतापर्यंत 38.5 कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले आहे. याचदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी माघ महिन्यातील अष्टमी तिथीला पवित्र त्रिवेणीत धार्मिक स्नान केले. हिंदू कॅलेंडरनुसार 5 फेब्रुवारी हा माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीची अष्टमीचा दिवस होता. या दिवसाला भीष्माष्टमी असेही म्हणतात. हा दिवस धार्मिक दृष्टिकोनातून खूप शुभ मानला जातो. या दिवशी तपस्या, ध्यान आणि आध्यात्मिक साधना अत्यंत फलदायी मानली जाते. तसेच तपश्चर्या, ध्यान आणि स्नान करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे सांगितले जाते.