For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदी यांची रेखा पात्रांशी चर्चा

06:33 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदी यांची रेखा पात्रांशी चर्चा
Advertisement

संदेशखाली अत्याचारांच्या पिडित आहेत भाजपच्या उमेदवार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालच्या बशीरहाट मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी रेखा पात्रा यांना उमेदवारी दिली आहे. रेखा पात्रा या संदेशखाली अत्याचार प्रकरणातील पिडित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पात्रा यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. रेखा पात्रा, आपण ‘शक्तीस्वरुप’ आहात, अशा शब्दांमध्ये त्यांनी पात्रा यांच्या धैर्याची प्रशंसा करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

Advertisement

संदेशखाली येथील तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान याने या भागात दहशत माजविली होती. तो आणि त्याच्या गुंडांनी येथे दलित, आदीवासी आणि मागासवर्गीय महिलांवर लैंगिक अत्याचार केले आहेत. तसेच संदेशखालीतील गोरगरीबांची घरे आणि जमीनी लुबाडल्या आहेत, असा आरोप आहे. शहाजहान आणि त्याच्या टोळीच्या विरोधात रेखा पात्रा यांनीही प्रथम आवाज उठविला होता. तसेच शहाजहान याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शनांचे आयोजन केले होते.

भाजपकडून उमेदवारी

रेखा पात्रा यांना भारतीय जनता पक्षाने बशीरहाट येथून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या साहसाचा आणि निर्धाराचा सन्मान करण्यासाठी त्यांना उमेदवारी दिली गेली आहे, असे प्रतिपादन त्यांच्या नावाची घोषणा करताना भारतीय जनता पक्षाने केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पात्रा यांच्या प्रचारकार्यासंबंधी विचारपूस केली. विजयासाठी निर्धाराने प्रयत्न करा. मतदार आणि भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी असतील. भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आपल्या यशासाठी तन मन धनाने समर्पित राहील. आपण आपल्या नारीशक्तीचा प्रत्यय या निवडणुकीत आणून द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना केले.

पंतप्रधान मोदी यांच्याशी भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पश्चिम बंगालमधील बरासात येथे 6 मार्चला जाहीर सभा झाली होती. त्यासभेप्रसंगी रेखा पात्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यांच्यासमवेत त्यांच्या गटातील अनेक महिला होत्या. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेशखालीत घडलेल्या लाजिरवाण्या घटनांसंबंधी माहिती दिली होती. संदेशखाली प्रकरण गेल्या दोन महिन्यांपासून गाजत आहे.

पात्रांविरोधात पोस्टर्स

पात्रा यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर बशीरहाट मतदारसंघात काही स्थानी त्यांच्या उमेदवारीविरोधात पोस्टर्स लावण्यात आली होती. मात्र, हे काम भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांनीच केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ उडावा म्हणून हे कारस्थान करण्यात आले आहे, असा आरोप या पक्षाने केला आहे. मतदार अशा कारस्थानांना भीक घालणार नाहीत. आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील मतदार तृणमूल काँग्रेसला धूळ चारल्याशिवाय राहणार नाहीत, असाही विश्वास भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला.

सरसू यांच्याशीही संपर्क

रेखा पात्रा यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्राध्यापिका टी. एन. सरसू यांच्याशीही संपर्क साधला आणि प्रचारकार्यासंबंधी चौकशी केली. सरसू या केरळमधील अलाथूर मतदारसंघांमध्ये उमेदवार आहेत. केंद्रात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांचे सरकार सलग तिसऱ्यांदा प्रस्थापित झाल्यानंतर केरळमधील सहकारी बँक घोटाळ्याची चौकशी केली जाईल. या प्रकरणात सर्वसामान्यांच्या पैशाशी खेळ करण्यात आला आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलणार आहे, असा विश्वास त्यांनी दिला. महिलांचा सामाजिक सन्मान वाढविण्यासाठी आणि त्यांना सुरक्षा देण्यासाठी कटिबद्ध असून अनेक योजनांवर काम सुरु आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Advertisement
Tags :

.