पंतप्रधान मोदी जाणार अमेरिका दौऱ्यावर
लवकरच तारीख ठरणार : परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच अमेरिकेचा दौरा करणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी शुक्रवारी येथे सांगितले. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्याच्या लवकर अंमलबजावणीसाठी दोन्ही देश काम करत आहेत. या भेटीची तारीख निश्चित करण्याचे काम सुरू आहे. योग्य वेळी त्याची घोषणा केली जाईल, असे जायस्वाल म्हणाले. तसेच तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाबाबत अमेरिकन एजन्सीशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
परराष्ट्र प्रवक्ते जायस्वाल यांनी मोदींच्या अमेरिका दौऱ्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांसह, काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकातील भारतीयांची स्थिती, इराणमध्ये बेपत्ता झालेल्या 3 भारतीयांसह अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणले जाईल, असेही त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने 21 जानेवारी रोजी तहव्वूर राणाच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला होता. पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक असलेल्या राणाच्या प्रत्यार्पणाची भारत बऱ्याच काळापासून मागणी करत आहे