12 फेब्रुवारीपासून पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अनेक मुद्द्यांवर होणार चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चालू महिन्यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर ही दोन्ही नेत्यांची पहिली भेट असेल. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांचे फोनवरून अध्यक्षीय निवडणुकीतील विजयानंतर अभिनंदन केले होते. पंतप्रधान मोदी हे 12 फेब्रुवारीपासून अमेरिकेच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत.
यादरम्यान दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांवर व्यापक चर्चा करतील. पंतप्रधान मोदी हे 10 आणि 11 फेब्रुवारी रोजी फ्रान्सच्या दौऱ्यावर असतील. तेथील ग्रँड पॅलेसमध्ये आयोजित एआय अॅक्शन समिटमध्ये ते सामील होणार आहेत. याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी हे वॉशिंग्टनसाठी रवाना होतील. परंतु दौऱ्याचा अधिकृत तपशील अद्याप जारी करण्यात आलेला नाही. हिंद-प्रशांत, संरक्षण सहकार्य, व्यापार आणि क्षेत्रीय सुरक्षेवर विस्तृत चर्चा होणार असल्याचे मानले जात आहे.
दुसरीकडे ट्रम्प प्रशासनाने युएसएड बंद करण्याचे संकेत दिले आहेत. ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतल्यावर भारताचा प्रभाव पडणार असला तरीही फारच कमी असणार आहे. ट्रम्प युएसएड कार्यक्रम बंद करण्यावर सहमत झाले आहेत अशी घोषणा ट्रम्प यांचे सहकारी आणि डीओजीईचे प्रमुख एलन मस्क यांनी केली आहे.
युनायटेड स्टेट एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटने (युएसएड) सुमारे 70 वर्षांपूर्वी भारतात काम करण्यास सुरुवात केली होती. ही संघटना संघर्षांनी प्रभावित अन्य देशांना मानवीय सहाय्य प्रदान करते आणि विकसनशील देशांना विविध मार्गांनी मदत करत असते. चालू आर्थिक वर्षादरम्यान भारताला युएसएडच्या माध्यमातून 140 दशलक्ष डॉलर्स प्राप्त होणार होते, भारताच्या एकूण अर्थसंकल्पाच्या तुलनेत ही किरकोळ रक्कम होती. याचदरम्यान नवी दिल्लीतील अमेरिकेच्या दूतावासाची वेबसाइट आणि अन्य ठिकाणांवरील युएसएडशी संबंधित सर्व पेज हटविण्यात आली आहेत.