पंतप्रधान मोदी लवकरच अमेरिका दौऱ्यावर
परराष्ट्र मंत्रालय प्रवक्ते रणदीप जयस्वाल यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरिस अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याबाबत सुतोवाच केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या टर्मचा कार्यकाल सुरु झाल्यानंतर व्हाईट हाऊसला भेट देणारे मोदी पहिलेच विदेशी पदाधिकारी असतील. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून भेटीकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. फ्रान्समध्ये 10 व 11 रोजी होणाऱ्या एआय अॅक्शन समिटनंतर ही भेट होऊ शकते. याबाबत दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये 27 जानेवारी रोजी सविस्तर चर्चा झाली आहे.
रणधीर जयस्वाल म्हणाले, हा दौरा भारताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी या भेटीचे नियोजन केले जात आहे. अद्याप अंतिम तारीख तसेच बैठकीचा मसुदा ठरला नसला तरीही या महिन्याच्या अखेरीस ही भेट होईल. यानंतर याच वर्षामध्ये ट्रम्प हेदेखील भारत दौऱ्यावर येण्याचे नियोजन व्हाईट हाऊस करत आहे. त्याचाही लवकरच निर्णय होईल. या भेटीमुळे भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत होणार आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनीदेखील हा दौरा भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प 2.0 सरकारच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध आणखी मजबूत होतील. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची अमेरिकेच्या संसदेतील उपस्थिती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्यक्तीगत मिळालेलं निमंत्रण या दोन गोष्टींमुळे भारत-अमेरिका संबंध एका वेगळ्या उंचावर जाण्याचे संकेत आहेत, असं हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले. तसेच पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात योग्य ताळमेळ आहे. ‘हाउडी मोदी‘ (ह्यूस्टन 2019) आणि ‘नमस्ते ट्रम्प‘ (अहमदाबाद, 2020) सारख्या कार्यक्रमांचं आयोजन त्यांच्या मित्रत्वाचं प्रतीक आहे, असंदेखील हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले आहेत.