For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदी यांना अमेरिकेत पाठिंबा

06:43 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदी यांना अमेरिकेत पाठिंबा
Advertisement

प्रसिद्ध गायिका मेरी मिलबेन यांनी केला स्तुतीवर्षाव

Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या आव्हानात्मक काळात भारताची स्थिती चांगल्या प्रकारे हाताळली आहे, अशी प्रशंसा अमेरितील जगप्रसिद्ध गायिका मेरी मिलबेन यांनी केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी नुकतीच भारतासंबंधात एक टिप्पणी केली होती. त्यासंबंधात त्या प्रतिक्रिया देत होत्या.

Advertisement

त्यांनी ट्रंप यांच्या धोरणांवर टीका केली. भारतासारख्या मित्र देशाच्या संदर्भात ट्रंप यांनी अती ताणू नये. भारताची मैत्री अमेरिकेच्या दृष्टीने आवश्यक आहे. ट्रंप यांनी भारताला आणखी व्यापार शुल्क लागू करण्याची धमकी नुकतीच दिली आहे. तथापि, ट्रंप यांचे प्रत्येक वक्तव्य भारताने गांभीर्याने घेऊ नये, अशीही सूचना मिलबेन यांनी केली आहे. मिलबेन या भारत समर्थक मान्यवर मानल्या जातात.

राहुल गांधी यांच्यावर टीका

काही दिवसांपूर्वी मेरी मिलबेन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली होती. तेव्हापासून त्या त्यांच्या भारतविषयक मतांसाठी चर्चेत आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या जनतेचे हित जोपासण्याचा वसा घेतला आहे. त्यांनी त्यांचे हे काम पुढे चालवावे. त्यांची आर्थिक आणि परराष्ट्रविषयक धोरणे भारताच्या हितासाठीच असून त्यांनी ती पुढे चालविण्याची आवश्यकता आहे, असेही प्रतिपादन मिलबेन यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना केले.

ट्रंप यांनाही आदर

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधी आदर आणि आस्था आहे. तथापि, ट्रंप यांना भारताविषयी कोणीतरी चुकीची माहिती देत आहे. भारताच्या संदर्भात त्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. त्यामुळे अमेरिकेने भारतासंबंधीची आपली धोरणे नको इतकी ताणली आहेत. त्यांचे लिंडसे ग्रॅहॅम यांच्यासारखे काही सहकारीही भारताविषयी काही टिप्पणी करतात. तथापि, त्यांच्या प्रत्येक टिप्पणीला भारताने उत्तर देण्याची आवश्यकता नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दीर्घकालीन राजनीती कशी करायची असते, हे जाणतात. त्यांनी सध्याच्या परिस्थितीत मोठाच संयम आणि धीरोदात्तपणा दाखविला आहे. हेच काम त्यांनी पुढेही करावे, अशी सूचनाही मेरी मिलबेन यांनी कार्यक्रमात केली आहे.

तुम्ही पुढे जात रहा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुम्ही पुढे जात रहा. अध्यक्ष ट्रंप आणि व्हाईट हाऊस सध्या या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या सिनेट आणि काँग्रेसच्या निवडणुकांवर लक्ष देत आहेत. ते भारताला फारसे दुखावणार नाहीत, असे वाटते. त्यांनी भारतावर अधिक दबाव आणणे टाळले पाहिजे. भारत अमेरिकेचा चांगला सहकारी आणि मित्रदेश होता आणि राहील, असेही आशावादी प्रतिपादन मिलबेन यांनी केले.

Advertisement
Tags :

.