पंतप्रधान मोदींकडून ‘सिंदूर’चे वृक्षारोपण
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपल्या निवासस्थानाच्या आवारात ‘सिंदूर’चा रोप लावला. 1971 च्या युद्धात उल्लेखनीय धैर्य दाखवणाऱ्या महिलांच्या गटाने त्यांना हे रोप अलिकडेच भेटीदाखल दिले होते. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. या ऑपरेशनच्या दृष्टीने या रोपाची लागवड करण्याचे विशेष महत्त्व आहे. हे झाड आपल्या देशाच्या महिला शक्तीच्या शौर्याचे आणि प्रेरणेचे एक मजबूत प्रतीक ठरणार असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला आहे.
पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत ट्विट केले आहे. ‘1971 च्या युद्धात धैर्य आणि शौर्याचे अद्भुत उदाहरण मांडणाऱ्या कच्छच्या शूर माता आणि भगिनींनी माझ्या अलिकडच्या गुजरात दौऱ्यात मला सिंदूरचा रोप भेट दिला. गुरुवारी जागतिक पर्यावरण दिनी माझ्या निवासस्थानी ते रोप लावण्याचे भाग्य मला मिळाले’ असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. तसेच हे रोप भेट देणाऱ्या महिलांना दिलेले वचन आज पूर्ण होत असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.