For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदी माझ्यावर काहीसे नाराज

06:03 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदी माझ्यावर काहीसे नाराज
Advertisement

व्यापार शुल्कासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांचे नवे विधान

Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी

भारतातून होणाऱ्या आयातीवर अमेरिकेत मोठ्या प्रमाणात व्यापार शुल्क लागू करण्यात आल्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यावर काहीसे नाराज आहेत, असे नवे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझी दूरध्वनीवरुन चर्चा झाली आहे. आम्ही संरक्षण सामग्री विक्री आणि व्यापार शुल्क यांच्या संदर्भात चर्चा केली. भारत रशियाकडून कच्चे इंधन तेल विकत घेत असल्याने अमेरिकेने भारतावर 25 टक्के अतिरिक्त शुल्क आकारले आहे. त्यामुळे ते माझ्यावर काही प्रमाणात नाराज आहेत, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात संबंध मित्रत्वाचे आहेत. तथापि, मोठ्या प्रमाणात कर लावल्याने त्यांच्यात तणाव आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

आपल्या कर धोरणाचे त्यांनी समर्थन केले. या धोरणामुळे अमेरिकेच्या संपत्तीत वाढ होत आहे. तसेच यामुळे अमेरिकेचा वचकही वाढला आहे. अमेरिका जगात शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. रशिया-युक्रेन युद्धात अमेरिका मध्यस्थी करीत आहे. युद्ध थांबविण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. अनेक युद्धे आमच्यामुळे थांबली आहेत, असेही प्रतिपादन त्यांनी त्यांच्या भाषणात केले आहे.

कर वाढविण्याचा इशारा

भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे पूर्णपणे थांबविले नाही, तर भारतावर आणखी कर लावले जातील, असा इशाराही ट्रम्प यांनी तीन दिवसांपूर्वी दिला होता. भारताने आता मला समाधानी ठेवण्यासाठी रशियाकडून केली जाणारी तेल खरेदी कमी केली आहे. तथापि, ती पूर्णपणे थांबविलेली नाही. त्यांना ती थांबवावी लागणार आहे, असेही त्यांनी सूचित केले होते. त्यानंतर त्यांचे नवे विधान आले.

भारताकडून इन्कार

रशियाकडून केली जाणारी तेलखरेदी पूर्णपणे थांबविली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना दिले होते, या वक्तव्याचा भारताने इन्कार केला आहे. भारत आपल्या नागरीकांच्या हिताचा विचार करुन ऊर्जेसंबंधीचे निर्णय घेतो. आम्हाला आमच्या 140 कोटी नागरीकांच्या हितांचे रक्षण करावे लागते. त्यामुळे आम्ही त्यासंबंधी आमच्या आवश्यकतांच्या अनुसार निर्णय घेत असतो. तेव्हा दबावाचा प्रश्न येत नाही, असे उत्तर भारताच्या परराष्ट्र विभागाने दिले आहे.

Advertisement
Tags :

.