सभांच्या स्पर्धेत पंतप्रधान मोदी आघाडीवर
निवडणूक आणि प्रचारसभा यांचे नाते अतूट आहे. प्रचारसभांशिवाय झालेली निवडणूक विरळाच असते. सध्या होत असलेल्या लोकसभा निवडणुकीतही प्रत्येक पक्षाचे स्टार प्रचारक प्रचार सभांचा धडाका लावत आहेत. देशात सर्वत्र त्यांचा संचार होत आहे. लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया निम्मी-अधिक पूर्ण झालेली असताना प्रचार सभांच्या स्पर्धेत पंतप्रधान मोदी हे मोठ्या अंतराने आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाचा विचार करायचा, तर त्यांच्या खालोखाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत. काँग्रेससंबंधी बोलायचे तर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आहेत. दोन राष्ट्रीय पक्षांच्या या चार प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभांचा आढावा या सदरात आज घेण्यात आला आहे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी
- सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे प्रमुख प्रचारक या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर 15 दिवसांपासून मतदानाचे तीन टप्पे संपेपर्यंत, अर्थात 31 मार्च ते 5 मे या कालावधीत 83 प्रचार सभा घेतल्या आहेत. या सभा 18 राज्यांमध्ये घेतल्या गेल्या.
- मतदानाच्या प्रथम टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 सभा घेतल्या. मतदानाच्या द्वितीय टप्प्यात त्यांनी 16 सभा घेतल्या. तर मतदानाच्या तृतीय टप्प्यात त्यांच्या 31 सभा झाल्या आहेत. याशिवाय तीन्ही टप्प्यांमध्ये मिळून त्यांच्या नावावर 8 रोड शोही लागलेले आहेत. सर्वाधिक सभा महाराष्ट्रात झाल्या आहेत.
राहुल गांधी
- काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून गांधी यांनी प्रथम तीन टप्प्यांमध्ये एकंतर 40 सभा घेतल्या आहेत. मात्र, त्यांच्या सभांची संख्या प्रमुख प्रचारक या दृष्टीने पाहिल्यास बरीच कमी असल्याचे दिसून येते. त्यांच्या सभांचा अधिक भर दक्षिणेतील राज्यांमध्ये होता, असेही उपलब्ध आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
- राहुल गांधी यांनी मतदानाच्या प्रथम टप्प्यात 21 सभा घेतल्या. द्वितीय टप्प्यात त्यांच्या केवळ 8 जाहीर सभा झाल्या. तर तृतीय टप्प्यात ही संख्या 11 इतकी होती. यांनी 2 रोडशोही या कालावधीत केले आहेत. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि तेलंगणा या चार राज्यांमध्ये त्यांच्या सर्वाधिक सभा झाल्या आहेत.
अमित शहा
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या तीन्ही टप्प्यांमध्ये मिळून 66 प्रचार सभा झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खालोखालचे प्रभावी प्रचारक म्हणून त्यांचे नाव घेतले जात आहे. त्यांनीही साधारणत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यात प्रचाराला प्रारंभ केला आहे. त्यांनी पश्चिम बंगालवर भर दिल्याचे दिसून येत आहे.
- मतदानाच्या प्रथम टप्प्यात शहा यांनी 18 प्रचार सभा घेतल्या. द्वितीय टप्प्यात त्यांच्या 29 सभा आयोजित केल्या गेल्या. तर तृतीय टप्प्यात 19 सभांना त्यांनी संबोधित केले. त्यांनी या कालावधीत सहा रोड शोही केले आहेत. त्यांनी आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये प्रचारसभा घेतल्या आहेत.
प्रियांका गांधी
- प्रियांका गांधी, ज्या राहुल गांधींच्या भगिनी आहेत, त्यांनी तीन्ही टप्प्यांमध्ये मिळून 29 प्रचार सभा घेतल्या. त्यांच्या जाहीर सभा संख्येने सर्वात कमी आहेत. राहुल गांधी यांच्या खालोखाल काँग्रेसमध्ये त्यांचे महत्व मानले जाते. मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी प्रियांका गांधींचे महत्व अधिक आहे.
- मतदानाच्या प्रथम टप्प्यात प्रियांका गांधी यांनी 9 सभा घेतल्या होत्या. द्वितीय टप्प्यात ही संख्या 10 होती. तर तृतीय टप्प्यात त्यांनी 10 जाहीर सभा घेतल्या. त्यांच्या जाहीर सभांची संख्या उत्तर भारतात अधिक दिसून आली. त्यांनी गेल्या महिनाभरात उत्तर भारतातील शहरांमध्ये 2 रोडशोही केलेले दिसून येतात.
प्रचार सभांची स्पर्धा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आपापल्या पक्षांच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रचार सभा आणि रोड शो केले आहेत. या नेत्यांमध्ये जणू प्रचार करण्याची स्पर्धाच लागली आहे. या स्पर्धेत अर्थातच नरेंद्र मोदी आघाडीवर आहेत. अर्थातच, ही केवळ प्रचारसभांची गणना आहे. प्रत्यक्ष मतगणना होईल, तेव्हा कोणाचा प्रचार सर्वाधिक प्रभावी ठरला आणि लोकांच्या पचनी पडला ते जिंकलेल्या जागांच्या आकडेवारीसह समजेल.
निम्म्याहून अधिक मतदानाची पूर्तता
- यावेळच्या लोकसभा निवडणुकीतील 543 जागांपैकी 283 मतदारसंघांमधील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. साधारणत: 66.5 टक्के मतदान झाले असून ते याच मतदारसंघांमधील मागच्या निवडणुकीच्या मतदानापेक्षा किंचित, अर्थात 2.5 टक्क्यांनी कमी असले, तरी समाधानकारक म्हणावे असेच मानले जात आहे.
एक योगायोग
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे, तर राहुल गांधी हे केँग्रेसचे प्रमुख प्रचारक आहेत. या दोन्ही नेत्यांनी मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात कमी सभा घेतल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 तर राहुल गांधी यांनी 8 सभा घेतल्या. दुसऱ्या टप्प्यात दोन्ही पक्षांचे द्वितीय क्रमांकांचे प्रचारक अनुक्रमे अमित शहा आणि प्रियांका गांधी यांनी अधिक सभा घेतल्याचे दिसून येत आहे.
कोणत्या राज्यांना महत्व...
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक 12 प्रचार सभा महाराष्ट्रात घेतल्या आहेत. मतदानाच्या तीन्ही टप्प्यांमध्ये ते महाराष्ट्रात प्रचाराला आले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशात 10 प्रचार सभा तिसऱ्या टप्प्यापर्यंत घेतल्या आहेत. कर्नाटक आणि राजस्थानात प्रत्येकी 8, तर बिहार, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश आणि गुजरात येथे प्रत्येकी 6, केरळमध्ये 2, तामिळनाडूत 3 तर तेलंगणात 1 प्रचारसभा घेतली आहे.
- याच्या उलट राहुल गांधी यांनी दक्षिण भारतात केरळ येथे 13, कर्नाटकात 7 तर तामिळनाडूत 6 सभा घेतल्या होत्या. प्रियांका गांधी यांनीही त्यांच्या सभांपैकी 10 सभा दक्षिण भारतात घेतल्या होत्या. अमित शहा यांच्या सभांपैकी 10 सभा त्यांनी दक्षिण भारतात, तर ऊर्वरित सभा उत्तर भारतात घेतल्याचे दिसून येत आहे.
प्रतिदिन किती सभा...
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिदिन प्रथम टप्प्यात 1.72, द्वितीय टप्प्यात 2.28 तर तृतीय टप्प्यात 3.27 प्रचारसभा घेतल्या आहेत. तर राहुल गांधी यांच्या प्रथम टप्प्यात 1.16, द्वितीय टप्प्यात 1.14 तर तृतीय टप्प्यात 1 सभा घेतल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचे प्रतिदिन प्रमाण प्रत्येक टप्प्यात वाढत गेलेले दिसते. तर राहुल गांधी यांच्या सभांचे प्रमाण कमी होत गेलेले दिसत आहे.
- या चार प्रमुख प्रचारकांच्या सभांना लोकांनी किती प्रतिसाद दिला आणि किती गर्दी केली याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. मात्र, काही तज्ञांनी व्यक्त केलेल्या अनुमानानुसार सर्वाधिक प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांना मिळत आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळतो. पण तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांपेक्षा कमी असतो, असेही म्हटले जाते. अर्थात, याचा प्रतिवादही केला जातो. अमित शहा आणि प्रियांका गांधी यांच्या सभांना जवळपास समान गर्दी असते, असेही बोलले जाते. प्रचार सभा कोणी किती घेतल्या, त्यांना लोकांचा प्रतिसाद किती मिळतो, ही केवळ कलदर्शक चिन्हे आहेत. अंतिमत: जागा कोण किती जिंकतो, ते महत्वाचे आहे.
तुलना केली तर...
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या प्रचार सभा संख्येची तुलना केल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्या साधारणत: दुप्पट सभा घेतल्या आहेत, असे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाने 73 वर्षांचे, तर राहुल गांधी 53 वर्षांचे आहेत, ही बाबही येथे आवर्जून लक्षात घ्यावी अशी आहे.
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचार सभांची तुलना प्रियांका गांधींच्या सभांशी केल्यास शहा यांनी गांधी यांच्यापेक्षा दुप्पटीहून अधिक सभा घेतल्याचे दिसून येते. शहा यांचे वय 59 वर्षे असून प्रियांका गांधी 52 वर्षांच्या आहेत. शहा यांनी गांधी यांच्यापेक्षा अधिक राज्ये व्यापलेली आहेत, असेही दिसून येते.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचार सभांची संख्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या मिळून सभांपेक्षाही बरीच अधिक आहे. तर अमित शहा यांच्या सभांची संख्या दोन्ही गांधींच्या मिळून सभांपेक्षा केवळ 3 ने अधिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या एकंदर सभांची संख्या 149 होत आहे.
- प्रचारक प्रथम द्वितीय तृतीय एकंदर
- पंतप्रधान मोदी 31 16 36 83
- अमित शहा 18 29 19 66
- राहुल गांधी 21 8 11 40
- प्रियांका गांधी 09 10 10 29