पंतप्रधान मोदी आज मंगळुरात
विविध योजनांचे लोकार्पण करणार
प्रतिनिधी /बेंगळूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार 2 सप्टेंबर रोजी मंगळूर दौऱयावर येत आहेत. येथील गोल्ड फिंच मैदानावर दुपारी 1ः30 वाजता होणाऱया कार्यक्रमात ते 3,800 कोटींच्या विविध 8 योजनांची कोनशिला आणि लोकार्पण करतील. पंतप्रधानांच्या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर मंगळूर शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणाऱया योजनांमध्ये कंटेनर आणि इतर मालवाहतुकीसाठी बर्थ क्र. 14 चे यांत्रिकीकरण, बीएस 4 उन्नतीकरण योजना, समुद्राच्या पाण्यावरील प्रक्रिया केंद्र यांचा समावेश आहे. याचप्रसंगी एनएमपीटीमध्ये (न्यू मंगलोर पोर्ट ट्रस्ट) एलपीजी आणि पीओएल सुविधा, गोदाम आणि खाद्यतेल प्रक्रिया केंद्र, डांबर साठा केंद्र आणि संबंधित सुविधा निर्मितीच्या कामांची तसेच कुळाई येथे मत्स्योद्योग बंदर विकासकामांची कोनशिला पंतप्रधानांच्या हस्ते बसविण्यात येणार आहे.
याप्रसंगी राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी, सर्बानंद सोनोवाल, हरदीपसिंग पुरी, श्रीपाद नाईक, शंतनू ठाकूर आदी उपस्थित राहणार आहेत.