For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदी आज अयोध्येत

06:44 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदी आज अयोध्येत
Advertisement

15 हजार कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन होणार

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

अयोध्येतील रामजन्मभूमीस्थानी निर्माण होत असलेल्या भव्य राममंदिराला भेट देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज शनिवारी या नगरीत दौरा होत आहे. या दौऱ्यात ते 15 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. अयोध्या नगरीचा सर्वांगिण विकास करण्यासाठी हे प्रकल्प आहेत.

Advertisement

राममंदिर पाहण्यासाठी यापुढे अयोध्येत भारतासह जगभरातून भाविकांची रीघ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नगरीत भक्तीपर्यटनासाठी येणाऱ्या भाविकांची कोणतीही अडचण होऊ नये. तसेच त्यांना अत्याधुनिक सोयी आणि सुविधांचा लाभ मिळावा, म्हणून हे प्रकल्प निर्माण करण्यात येत आहेत.

पाच मोठे प्रकल्प

अयोध्येत येत्या काही काळात पाच मोठे प्रकल्प क्रियान्वित होतील. अयोध्या धाम रेल्वे जंक्शन स्थानक, अमृत भारत रेल्वेगाड्या, रेल्वे पायाभूत सुविधा निर्माण, नूतन अयोध्या विमानतळ, पर्यटकांसाठी सुविधा प्रकल्प आणि अयोध्या परिसर सुधारणा असे हे प्रकल्प आहेत. त्यांचे उद्घाटन केले जाणार आहे.

अयोध्याधाम रेल्वेस्थानक

अयोध्येच्या छोट्या रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले असून त्यासाठी 240 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या रेल्वेस्थानकाची तीन मजली वास्तू निर्माण करण्यात आली असून तिचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात येईल. या प्रकल्पामुळे अयोध्या रेल्वे स्थानकाचा कायापालट झाला आहे, अशी प्रतिक्रिया त्याला भेट दिलेल्या अनेकांनी व्यक्त केली आहे.

अमृत भारत रेल्वेगाड्यांचा प्रारंभ

आज शनिवारी सव्वा अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतून अमृत भारत वेगवान रेल्वेगाड्यांचा प्रारंभ करण्यात येईल. सर्व भारतात या गाड्यांचा संचार होणार आहे. या गाड्यांची रचना अत्याधुनिक पद्धतीने करण्यात आली असून प्रवाशांच्या सोयींचा विचार करण्यात आला आहे.

रेल्वे पायाभूत सुविधा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 2,300 कोटी रुपयांच्या तीन रेल्वे पायाभूत सुविधांचा शुभारंभ होणार आहे. रुमा-चकेरी-चंदेरी तिसरी रेल्वे लाईन प्रकल्प, जुनापूर-अयोध्या-बाराबंकी रेल्वेलाईनचे दुहेरीकरण आणि मल्हौर-दालीगंज रेल्वेलाईनचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरण हे ते तीन प्रकल्प आहेत.

नूतन अयोध्या विमानतळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येच्या नूतन विमानतळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या विमानतळाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. धावपट्ट्यांची संख्या वाढविण्यात आली असून सुविधा आणि त्यांची गुणवत्ता यांच्यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.

परिसर सुधारणा प्रकल्प

संपूर्ण अयोध्या नगरी आणि तिच्या आसपासचा प्रदेश यांचे अमूलाग्र परिवर्तन करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यांच्यातील काही प्रकल्पांची पूर्तता झाली असून त्यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होत आहे. हे प्रकल्प प्रामुख्याने पर्यटक आणि भक्तांच्या सोयीसुविधांचे आहेत. वशिष्ठ कुंज नामक गृहसंकुल निर्माण करण्यात येत आहे. त्याशिवाय विविध आश्रम, विश्रामगृहे, अतिथीगृहे इत्यादी अनेक प्रकल्पांची कोनशीला त्यांच्या हस्ते स्थापन होणार आहे.

22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा

अयोध्येत 22 जानेवारीला भव्य राममंदिराच्या गर्भगृहात भगवान रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. हा ऐतिहासिक कार्यक्रमही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्या नगरीला सर्व प्रकारांनी सज्ज करण्यात येत असून लक्षावधी रामभक्त उपस्थित राहतील, ही शक्यता गृहित धरुन पायाभूत सुविधांचे निर्माणकार्य करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.