पंतप्रधान मोदी सरन्यायाधीशांच्या घरी
श्रीगणेशाचे केले पूजन, त्यावरुन प्रचंड वाद, भाजप-विरोधी पक्षांमध्ये जोरदार वाग्युद्ध
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी श्रीगणेशमूर्तीचे पूजन केले आहे. मात्र, हे पूजन वादाचे कारण ठरले असून विरोधी पक्षांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रत्यक्ष आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाने या टीकेचा जोरदार प्रतिवाद केला असून आणि मनमोहनसिंग सरकारच्या काळातील इफ्तार पार्ट्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या मुद्द्याने आता राजकीय रंग घेतला असून जोरदार शब्दयुद्ध केले जात आहे.
बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरन्यायाधीशांच्या घरी त्यांच्या आमंत्रणावरुन गेले होते. सरन्यायाधीश चंद्रचूड आणि त्यांची पत्नी कल्पना यांनी त्यांचे स्वागत केले. सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणपतीचे पूजन आणि आरती केली. यावेळी चंद्रचूड यांच्यासह त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी महाराष्ट्राची पारंपरिक वेषभूषा केली होती. तसेच पांढरी टोपीही परिधान केली होती. त्यानंतर त्यांनी सरन्यायाधीशांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आणि क्षेमकुशल विचारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरन्यायाधीशांच्या अधिकृत निवासस्थानी साधारणत: अर्धा तास होते. त्यांची पूजा आणि आरती यांचे व्हिडीओ सध्या इंटरनेटवर प्रसिद्ध होत आहेत.
प्रचंड राजकीय वाद
या घटनेवरुन आता प्रचंड राजकीय वाद निर्माण करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गेलेच कसे, असा प्रश्न विरोधी पक्षांकडून विचारण्यात येत आहे. आम्हाला जी शंका इतके दिवस येत होती, ती खरी ठरत आहे, असे सूचक उद्गार शिवसेना (उबाठा) चे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी काढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश यांच्यात काही शिजत आहे काय अशी शंका त्यांनी या उद्गारातून अप्रत्यक्षरित्या सूचित केली. इतर विरोधी पक्षनेत्यांनीही शंका उपस्थित केल्या आहेत.
सुनावणीपासून स्वत:ला दूर करा
सध्या सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील न्यायपीठासमोर महाराष्ट्रातील आमदार अपात्रता प्रकरण प्रलंबित आहे. लवकरच या प्रकरणाची सुनावणीही होणार आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे एका राजकीय पक्षाचे नेते आहेत, त्यांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन पूजा करण्याइतकी जवळीक दाखवावी, हे शंकास्पद आहे. आता सरन्यायाधीशांनी स्वत:ला महाराष्ट्रातील प्रकरणाच्या सुनावणीपासून दूर करावे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
काही वकीलांचीही प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाण्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या काही वकीलांनीही टिप्पणी केली आहे. असे करण औचित्याला धरुन नाही, असे या वकीलांचे म्हणणे आहे. अशा कृतीमुळे शंकेला वाव मिळतो, अशी प्रतिक्रिया काही वकीलांनी नंतर व्यक्त केली आहे.
भाजपकडून जोरदार प्रतिवार
गणेशोत्सव हा महाराष्ट्रासह साऱ्या देशाच्या वैभवी सांस्कृतिक ठेव्याचे प्रतिक आहे. या उत्सवासाठी पंतप्रधान मोदी यांनी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाला भेट देणे यात काहीही आक्षेपार्ह नाही. पण विरोधी पक्षांना प्रत्येक स्थानी केवळ स्वार्थी राजकारणच दिसत असल्याने ते बेताल व बिनबुडाची टीका करीत आहेत. विरोधकांचे कोणत्याही हिंदू परंपरेशीच शत्रुत्व असल्याने त्यांना या साध्या व सरळ घटनेतही राजकारण दिसले, अशी टीका भाजपा प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी इंटरनेटवर संदेश प्रसारित करुन केली आहे.
त्या इफ्तार पार्ट्यांचे काय ?
मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील संपुआ सरकारच्या काळात राजकीय धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱ्या पक्षांच्या नेत्यांच्या घरी इफ्तार पार्ट्यां साजऱ्या केल्या जात असत. अशी टिप्पणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. अशा पार्ट्यांची छायाचित्रेही या पक्षाने इंटरनेटवर प्रसारित केली आहेत. धर्मनिरपेक्षता म्हणजे केवळ इफ्तार पार्टी करणे नव्हे. गणेशोत्सवही महान भारतीय परंपरेचा आणि सर्वसमावेशकत्वाचाच भाग आहे, अशी खोचक टिप्पणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केली.