पंतप्रधान मोदी-अध्यक्ष ट्रम्प यांची चर्चा
दूरध्वनीवरुन साधला संवाद, संरक्षणावरही बोलणी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकमेकांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली आहे. गुरुवारी झालेल्या या चर्चेत आर्थिक संबंध, व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, भू-राजकीय धोरण अशा अनेक मुद्द्यांवर बोलणी झाली आहेत. दोन्ही नेत्यांमधील चर्चा सकारात्मक झाली, असे नंतर स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या भारत आणि अमेरिका यांच्या प्रतिनिधीमंडळांमध्ये भारतात व्यापार कराराविषयी चर्चा होत आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या चर्चेला महत्व देण्यात येत आहे. व्यापार करार चर्चेत झालेल्या प्रगतीसंबंधी त्यांनी चर्चा केली. तसेच, दोन्ही देशांमधील व्यापार संबंध दृढ ठेवण्याच्या दृष्टीने निर्माण झालेले सकारात्मक वातावरण पुढेही ठेवण्याविषयी दोन्ही देशांचे एकमत झाले, अशी माहिती नंतर देण्यात आली आहे.
तंत्रज्ञान, संरक्षणविषयक मुद्दे
अतिमहत्वपूर्ण तंत्रज्ञान, ऊर्जा विकास, संरक्षण आणि संरक्षण साधने या मुद्द्यांवर चर्चेत भर देण्यात आला. भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या ‘कॉम्पॅक्ट’ कराराच्या संदर्भात बोलणी करण्यात आली. दोन्ही देशांमध्ये व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि सामरिक भागीदारी या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. दोन्ही नेत्यांनी विभागीय आणि जागतिक घडामोडींसंबंधीही विचारांचे आदान-प्रदान केले. सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे निर्माण झालेली आव्हाने आणि त्या आव्हानांशी दोन हात करण्यासाठी आवश्यक असलेले परस्पर सहकार्य यांच्या संबंधांमध्येही चर्चा झाली.
पुतीन दौऱ्यानंतर प्रथमच चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नेहमीच दूरध्वनीवरुन चर्चा होत असते. काही दिवसांपूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताचा दौरा केला होता. त्या दौऱ्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दूरध्वनीवरुन झालेली ही प्रथम चर्चा आहे. त्यामुळेही ती महत्वाची मानण्यात येत आहे.
अमेरिकेच्या संसदेत टीका
अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहात बुधवारी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतासंबंधीच्या भूमिकेवर मोठी टीका करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या धोरणामुळे भारतासारखे अमेरिकेचे धोरणात्मक भागीदार देश अमेरिकेच्या प्रतिस्पर्ध्यांच्या जवळ जात आहेत. अंतिमत: या धोरणाचा अमेरिकेला मोठा तोटा होणार आहे, अशी टीका अमेरिकन काँग्रेसच्या सदस्या सिडनी कॅमलेगर-डोव्ह यांनी केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष नोबेल पुरस्कार मिळविण्याच्या नादात अमेरिकेच्याच मित्रांना अमेरिकेपासून तोडत आहेत, असेही स्पष्ट प्रतिपादन डोव्ह यांनी केले आहे.
करार कधी होणार...
भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार नेमका कधी होणार याविषयी या दोन देशांमध्येच नव्हे, तर जगातही उत्सुकता ताणली गेली आहे. गेले दहा महिने दोन्ही देशांमध्ये व्यापार करारासंबंधी चर्चा केली जात आहे. तथापि, अद्यापही या कराराच्या स्वरुपाला निश्चिती प्राप्त झालेली नाही. बऱ्याचशा मतभेदांवर तोडगा काढण्यात आल्याचे दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये एक व्यापक करार करण्यात येईल, असेही स्पष्ट केले जात आहे. तथापि, अद्यापही करार निश्चितपणे केव्हा होणार, हे अस्पष्टच आहे.