पंतप्रधान पाच देशांच्या दौऱ्यावर रवाना
सुरुवातीला घाना देशाला भेट देणार : 6 ते 8 जुलै दरम्यान ब्राझीलमध्ये ‘ब्रिक्स’ परिषदेला उपस्थिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पाच देशांच्या विदेश दौऱ्यावर रवाना झाले. सर्वप्रथम ते घाना या देशाला भेट देतील. गुरुवार, 3 जुलैला ते घानामधील विविध कार्यक्रमांना भेट देण्यासोबतच द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर 3 आणि 4 जुलैला ते त्रिनिदाद अँड टोबॅगो येथे जातील. त्यापाठोपाठ 4 आणि 5 जुलैला अर्जेंटिना येथे पोहोचतील. 6 ते 8 जुलैदरम्यान ब्राझीलची राजधानी रिओ डी जानेरो येथे होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी ते विविध देशांच्या शिष्टमंडळाशी स्वतंत्र बैठका करतील. ब्रिक्स परिषद संपल्यानंतर ते अंतिम टप्प्यात 9 जुलैला नामिबिया या देशाच्या दौऱ्यावरही जाणार आहेत.
यंदाची ‘ब्रिक्स’ शिखर परिषद ब्राझीलमध्ये होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी त्या देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ब्राझीलच्या दौऱ्याला जोडून ते अन्य चार देशांचा दौराही करणार आहेत. ‘ब्रिक्स’ परिषदेत ते पहलगाम येथील दहशतवादी हल्ला, पाकिस्तानकडून होणारे दहशतवादाचे पोषण, भारताचे ‘सिंदूर’ अभियान हे मुद्दे प्रकर्षाने उपस्थित करणार आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले. ब्राझीलमधील ब्रिक्स परिषद 6 जुलै ते 8 जुलै अशी तीन दिवस होणार आहे. पंतप्रधानांचा त्रिनिदाद आणि टोबॅगो दौरा महत्वाच्या मानण्यात येत आहे. तसेच घाना देशाला भेट देणारे ते गेल्या 30 वर्षांमधील प्रथम भारतीय नेते ठरणार आहेत.
परिषदेत काय मांडणार...
ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक प्रशासन, शांतता-सुरक्षा, बहुविधत्व बळकट करणे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा उत्तरदायी पद्धतीने उपयोग, पर्यावरण संरक्षण, जागतिक आरोग्य आणि आर्थिक तसेच औद्योगिक मुद्दे आणि त्यांच्यासंबंधी भारताची भूमिका मांडणार आहेत. पहलगाम हल्ला आणि त्याला अनुषंगून दहशतवादाचा मुद्दा ते प्रकर्षाने मांडतील, अशी माहिती देण्यात आली.
अनेक द्विपक्षीय बैठका
‘ब्रिक्स’ परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेचे सदस्य असणाऱ्या अनेक देशांच्या प्रमुखांची स्वतंत्ररित्या चर्चा करणार आहेत. या परिषदेला ते ब्राझीलचे नेते लुला डिसिल्वा यांच्या आमंत्रणावरून जात आहेत. दोन्ही नेत्यांची द्विपक्षीय संबंध, गुंतवणूक आणि व्यापारवृद्धीसंबंधी चर्चा होणार आहे. ब्रिक्स परिषदेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका असे सहा देश आहेत. त्यांच्यासह आणखी पाच देश या संघटनेचे अतिथी देश आहेत. ही प्रामुख्याने आर्थिक व्यवहारांसंबंधीची संघटना आहे.